Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०७
आर्थिक जीवन
 

असे. भूमिहीन शेतमजूर हे त्या काळीही होते. सामान्यतः शेतकऱ्यांचे जीवन कष्टाचेच होते. मग या शेतमजुरांचे कसे असेल हे सांगण्याची आवश्यकता नाही. नांगरणी, कुळवणी, पेरणी ही कामे पुरुष करीत. स्त्रिया घर संभाळून राहिलेल्या वेळात वेचणी, राखणी इ. कामे करीत.

पिके
 तांदूळ हे त्या काळी मुख्य पीक होते. याचे दोन तीन प्रकार असत. कलम- कोळंबा, साळी, व्रीही अशी त्यांची नावे आढळतात. गहू आणि तूर, हरभरा, मूग मसुरा ही कडधान्ये ही दुसरी पिके. तीळ, मोहरी, जव, यांचेही भरपूर उल्लेख आहेत. आणि कापूस व ऊस ही जरा श्रीमंती आणि व्यापारी पिकेही काही शेतकरी काढीत असत.

पाणी
 बहुतेक शेती पावसाच्या पाण्यावरच होई. त्याच्या जोडीला विहिरींचे पाणी मोटेने किंवा रहाटगाडग्याने जमिनीला देत. तलावांचे उल्लेख क्वचित कोठे आढळतात. पण कालवे, पाटबंधारे यांची वर्णने आढळत नाहीत. हिंदुस्थानात वेदकाळापासून कालव्यांची पद्धत होती. महाभारतात तसे उल्लेख आहेत. पण वर उल्लेखिलेल्या पंडितांच्या ग्रंथांत धरणे, कालवे, पाटस्थळे, यांची वर्णने नाहीत. तेव्हा त्या दृष्टीने फारशी प्रगती झालेली नसावी असे वाटते.

पशुधन
 पशुधनाचे महत्त्व त्या काळीही लोकांनी जाणलेले होते. गायी, बैल, म्हशी, टोणगे, हत्ती, उंट, शेळ्या, मेंढ्या, डुकरे असे अनेकविध पशू लोक पाळीत. गोधनाला त्या काळी सर्वांत जास्त महत्त्व होते. राजे लोक गोधनाची मोठमोठी खिल्लारे बाळगीत व त्यावर गोपालक, तंतिपाल असे अनेक प्रकारचे अधिकारी नेमून त्यांची निगा राखीत. दुर्योधन व विराट या राजांची अशी खिल्लारे असल्याचे वर्णन महाभारतात आहे. पांडवांपैकी सहदेव हा विराटाकडे तंतिपाल म्हणूनच होता. तो पशुवैद्यक उत्तम जाणीत असे. गायीची उत्तम पैदास करण्याची विद्याही त्या काळी अवगत होती असे दिसते.

कर
 शेतीवर नाना प्रकारचे कर त्या वेळी असत. पशुधनावरही कर असत. बळी, भाग, विवित, कर असे करांचे वर्गीकरण कौटिल्याने दिले आहे. वेठबिगार त्या काळी सर्रास चालू होती. तोही एक प्रकारचा करच मानला जात असे. शिवाय निर-