Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
१९८
 

याचा अर्थ असा की या उत्तरकालीन स्मृतींनी त्रैवर्णिकांनाही सहभोजन निषिद्ध ठरविले. याच काळात अनुलोम विवाह बंद होत आले होते. शिवाय दक्षिणेतील ब्राह्मणांनी मांसाहार वर्ज्य केला होता. त्यामुळे सहभोजन दिवसेंदिवस अशक्य होत गेले. वास्तविक बन्याच वैश्यांनीही मांसाहार वर्ज्य केला होता. तेव्हा त्यांच्या बरोबर भोजनास हरकत नव्हती. पण त्यांना स्मृतींनी शूद्रसम ठरविले होते. यामुळे सह- भोजनाची प्रथा लुप्त झाली.' ( राष्ट्रकूट, पृ. ३३९).
 पूर्वी मिश्रविवाह होते, व्यवसायसंकर होता आणि एकत्र अन्नपान व्यवहारही होता. या तिन्ही रूढी समाजाच्या ऐक्याला पोषक व संवर्धक होत्या. त्या इ. सनाच्या नवव्या दहाव्या शतकात नष्टप्राय होऊ लागल्या. त्यामुळे समाजाची एकरूपता नाहीशी होऊन तो विघटित झाला, परकी आक्रमणास बळी पडला.

अस्पृश्य
 ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या हिंदुसमाजाच्या घटकांचा विचार झाला. आता अस्पृश्यांचा विचार करावयाचा. पंडित सातवळेकर, श्रीधरशास्त्री पाठक, म. म. काणे या पंडितांचे असे निश्चित मत आहे की पूर्वकाळी आजच्या सारखी अस्पृश्यता हिंदुममाजात मुळीच नव्हती. काणे म्हणतात की वेद वाङ्मयात चर्मकार, चांडाळ पौल्कस ही नावे आहेत, पण त्या जाती अस्पृश्य आहेत असा कोठेही निर्देश नाही. आरंभीच्या काही स्मृती चारच वर्ण मानतात. मनूच्या मते पाचवा वर्णच अस्तित्वात नाही. याचा अर्थ असा की त्या काळी आजच्या अस्पृश्यांची गणना शूद्रवर्णातच होत असे. आणि शूद्राच्या हातचे अन्न खाण्यासही ८ व्या ९ व्या शतकापर्यंत शास्त्रकारांची हरकत नव्हती. वरील तीनही पंडितांच्या मते जन्मजात अस्पृश्यता हिंदुधर्मशास्त्रात फक्त चांडाळाच्या बाबतीत सांगितली आहे. ब्राह्मण स्त्री व शूद्र पुरुष यांचे अपत्य म्हणजे चांडाळ, तोच फक्त जन्माने अस्पृश्य. श्रीधरशास्त्री पाठक म्हणतात, 'ही अस्पृश्यता फक्त त्या व्यक्तीपुरती आहे. चांडाळ म्हणून एक जात आहे ती यामुळे अस्पृश्य ठरत नाही. शूद्र-ब्राह्मणी यांच्या संकरापासून झालेली अपत्ये यांना लावलेला चांडाळ शब्द पारिभाषिक आहे, तो जातीचा वाचक नाही. चांडाळ जाती म्हणून आहे ती शूद्र आहे, म्हणून ती स्पृश्यच आहे. वरील पारिभाषिक चांडाळ ते मात्र खरे जन्मजात अस्पृश्य. इतर काही अस्पृश्य शास्त्रात सांगितले आहेत, ते जन्मजात नव्हेत. ते केवळ त्यांच्या हीन व्यवसायामुळे अस्पृश्य झालेले असतात आणि तेही तेवढ्या वेळेपुरते. त्यातून ते मोकळे झाले, स्वच्छ झाले की ते स्पृश्य होतात. पारिभाषिक चांडाळ सोडले तर इतरांच्या बाबतीत जी अस्पृश्यता मानली जाते ती उत्तरकालीन रूढीमुळे आलेली आहे. तिला शास्त्राधार नाही. रूढी- वादी लोकांनी आपल्या लहरीप्रमाणे हा कडकपणा अवलंबिलेला आहे (अस्पृश्यतेचा शास्त्रार्थ, भाग ४ था व ५ वा). अस्पृश्यता पूर्वी नव्हती. अस्पृश्यांच्या दर्शनाने