Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
१९२
 

आड आले नाही. सामान्य जनांनी त्यांच्या राजपदाला मान्यता दिली, एवढेच नव्हे तर मोठमोठ्या वैदिक ब्राह्मणांनीही दिली. हे ब्राह्मण शेकडो वर्षे या शूद्र राजांकडून भूमीची व धनाची दाने घेत राहिले. शूद्राकडून दान येणे हे निंद्य होय. पण तरीही प्रत्यक्षात ब्राह्मणांनी तसे मानले नाही. आणि त्या ब्राह्मणांना लोकांनीही कमी लेखिले नाही. शूद्र राजा होणे, कलियुगाचे लक्षण, असे शास्त्रकार मानतात. महाभारतात तसे सांगून त्यामुळे होणाऱ्या अनर्थाचे भयंकर वर्णन केलेले आहे. पण प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. मौर्य, सातवाहन इ. शूद्र सम्राटांच्या कारकीर्दीत या भूमीला वैभवाचे व समृद्धीचे दिवसच प्राप्त झाले. जितक्या अंगांनी समाजाचा उत्कर्ष होणे शक्य असते तितक्या अंगांनी झाला, आणि शास्त्रकारांची भीती व्यर्थ ठरली.

ब्राह्मण - सर्व व्यवसाय
 यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान व प्रतिग्रह हे ब्राह्मणांचे व्यवसाय, असे एक रूढ शास्त्र आहे. पण मन्वादी स्मृतिकारांनीच राजाने न्यायाधीश व मंत्री या पदांवर ब्राह्मण नेमावे, असे सांगितले आहे. चार मंत्री ब्राह्मण असावे हे महाभारताचे मत वर सांगितलेच आहे. याशिवाय आपद्धर्म म्हणून ब्राह्मणांनी शेती, व्यापार हे उद्योग करण्यास हरकत नाही, असेही शास्त्र सांगते. पण आपत्काळ नेमका कोणता हे कोणी सांगितलेले नाही. त्यामुळे पुरातन काळापासून ब्राह्मण सर्व प्रकारचे व्यवसाय करीत आहेत. काही स्मृतींनी ब्राह्मणांना शेती वर्ज्य सांगितली आहे. कारण शेतीत हिंसा होते. पण ब्राह्मण राजे झाले व सेनापती झाले म्हणजे त्यांच्या हातून हिंसा होणारच. नव्हे, तो त्यांचा धर्मच ठरतो. धर्मावर संकट आले की सर्व द्विजांनी हाती शस्त्र घ्यावे, असे शास्त्र म्हणते. पण राजे व सेनापती यांनी कायमचेच हाती शस्त्र घेतलेले असते. वाकाटक घराणे हे ब्राह्मण होते. त्यांनी तीनशे वर्षे राज्य केले. या कालखंडात ब्राहाण सेनापती तर अनेक होऊन गेले. रेवादास दीक्षित व विसोत्तर दीक्षित हे राष्ट्रकूटांचे ब्राह्मण सेनापती फार शूर होते असे त्यांचे वर्णन शिलालेखात आहे. शिवाय गणराम व तक्षदत्त या ब्राह्मणांना धारातीर्थी मृत्यू आला म्हणून त्यांचा गौरव केलेला आहे. हे सर्व ब्राह्मण सोमयाजी, वेदवेत्ते असेही होते. ब्राह्मण कुलाला भूषण असा त्यांचा गौरव कोरीव लेखांत आहे (राष्ट्रकूट, डॉ. आळतेकर, पृ. २५० ). यादवांचे नागरस, सोविदेव, शिवराज, खोलेश्वर, हेमाद्री हे सेनापती ब्राह्मण होते आणि शास्त्रपारंगतही होते. राजसेवा करील तो ब्राह्मण एक वर्षात ब्राह्मण्यापासून पतित होतो असे शास्त्र आहे. पण हे कधीच कोणी मानले नाही. ब्राह्मणांनी न्यायाधीश, मंत्री, सेनापती ही पदे तर भूषविलीच, पण राज्यकारभारातील इतरही अनेक प्रकारची सेवा ते मौर्य - काळापासून करीत होते. राष्ट्रकूटांच्या काळी तर अनेक ब्राह्मण राजसेवेत असल्याचे दिसते. वैद्यकीचा व्यवसाय मनूने ब्राह्मणांना वर्ज्य मानला आहे. अशा ब्राह्मणांना तो हीन मानतो. पण अनेक ब्राह्मण हा व्यवसाय करीत होते; इतकेच नव्हे तर त्यांना