असा आर्य शब्दाचा अर्थ आहे. 'वृत्तेन हि भवत्यार्थी न धनेन न च विद्यया. ' आर्यत्व हे चारित्र्यावर अवलंबून आहे, असे महाभारतात स्पष्टपणे सांगितलेले आहे. त्या प्राचीन काळी भारतात नाग, द्रविड, असुर, वानर, दैत्य, दानव, निपाद, किरात, कैवर्त, पुलिंद, आंध्र, यवन, पणी, कांबोज, पारद, पल्लव, खस, भरत, तुर्वसू इ. शेकडो जमाती लहान लहान पुंज करून येथे राहिल्या होत्या. या जमातींतून अग्नीची पूजा करणारा, संस्कृत भाषा बोलणारा एक थोर, पराक्रमी प्रज्ञावंत व बुद्धिमान असा वर्ग उदयास आला. यजनशीलता व तत्संबद्ध अशी वैदिक संस्कृती हे त्याचे व्यवच्छेदक लक्षण होते, भिन्न वंश किंवा शुभ्र वर्ण हे नव्हे. हा वर्ग आपल्याला श्रेष्ठ व आर्य म्हणवू लागला. आणि सर्व जनांना आपल्या वैदिक संस्कृतीची दीक्षा देऊन त्यांनाही आर्य करावयाचे अशी त्याने प्रतिज्ञा केली. 'कृण्वतो विश्वमार्यम' ही ती प्रसिद्ध प्रतिज्ञा होय. आर्य हा शब्द वंशवाचक असता तर या प्रतिज्ञेला काहीच अर्थ निर्माण झाला नसता. यज्ञप्रधान वैदिक धर्माचे संस्कार सर्वांवर करून हा शेकडो जमातींनी घडलेला भारतीय समाज एकरूप करून टाकावयाचा, सर्वांना आर्य करून सोडावयाचे असा त्या प्रतिज्ञेचा अर्थ आहे.
रक्तसंकर
सर्व भारताला एकरूप करून टाकण्याच्या, भारताचे आर्यीकरण करण्याच्या आर्यांच्या या महान प्रयत्नाला त्या काळी फार मोठे यश आले यात शंका नाही. सर्व भरतखंड ही एक भूमी आहे, भारतीयांचा सर्व समाज एक समाज आहे, अशी भावना आज हजारो वर्षे भारतात दृढमूल झालेली आहे ती त्याच प्रयत्नाचे फल होय. हे साधण्यासाठी आपण सर्व एकवंशीय आहो ही जाणीव आर्यांनी सर्व समाजांत निर्माण करण्याची पराकाष्ठा केलेली दिसते. पुराणे, महाभारत, रामायण, यांतील कथांवरून हे स्पष्ट दिसते. आज देव, दैत्य, असुर, नाग, राक्षस या सर्व भिन्न वंशीय जमाती होत्या, असे आपण मानतो. पण पुढील कथेवरून या भ्रमाचा निरास होईल. कश्यप हा थोर ब्राह्मण, दिती व अदिती या त्याच्या दोन स्त्रिया. एकीची प्रजाती दैत्य व दुसरीची ती आदित्य याच कश्यपाने प्रजापतीच्या बारा कन्यांशी विवाह केला होता. आणि त्यापासून त्याला प्रजा झाली ती कोणती ? नाग, सर्प, गरुड, राक्षस, अप्सरा. असुर या शब्दाचा अर्थ राक्षस, दैत्य, अत्यंत क्रूर, हिंस्त्र, रानटी असा आज रूढ आहे. वेदांत या शब्दाचा तसा अर्थ आहे. पण दुसरा याच्या बरोबर उलट असाही अर्थ वेदांत आहे. असुर म्हणजे परमात्मा, देवाधिदेव ! इन्द्र, वरुण, अन्नी यांनाही वेदांत असुर म्हटले आहे. सत्यवान हा शाल्व कुळातला व सावित्री ही शिबी कुळातली. ही दोन्ही कुळे दैत्यकुळे होती. हा सत्यवान सूर्याप्रमाणे तेजस्वी, बृहस्पतीसारखा बुद्धिमान, इन्द्रासारखा सामर्थ्यवान व पृथ्वीप्रमाणे क्षमाशील होता ( म्हणजेच आर्य ) असे नारदांनी त्याचे वर्णन केले आहे.
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२१०
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८३
समाजरचना