पुराणे यांत एकही ग्रंथ असा नाही की ज्यात लोकांनी मागून भर घातलेली नाही. त्यामुळे अमके मत मनूचे, अमके याज्ञवल्क्याचे, मत्स्यपुराण असे म्हणते व वायुपुराणात तसे सांगितले आहे, या म्हणण्याला फार थोडा अर्थ आहे. शिवाय मागून प्रक्षेप करणाऱ्यांनी चालू विषयाचा, पूर्वापर संदर्भाचा, ग्रंथातील विचारसूत्राचा कसलाही विचार न करता वाटेल त्या ठिकाणी वाटेल ती मते घुसडून दिली आहेत. त्यामुळे एकाच ग्रंथात अत्यंत परस्पर विरुद्ध अशी मते अनेक वेळा आढळतात. त्यामुळे एखाद्या धर्मशास्त्रज्ञाचा आधार घेणे पुष्कळ वेळा धोक्याचे होऊन बसते. यामुळे या प्राचीन काळच्या धार्मिक वा सामाजिक इतिहासाचा अभ्यास करताना, या काळात दोन भिन्न विचारप्रवाह होते, भिन्न पंडितांनी भिन्न विचारप्रणाली मांडल्या होत्या आणि त्या त्या कालखंडात ज्या विचारसरणीचा जोर जास्त असेल, प्रभाव जास्त पडेल तिच्याप्रमाणे समाजाचा उत्कर्षापकर्ष होत होता, एवढेच निश्चित करणे शक्य होते. अमके मत अमक्या धर्मवेत्याने मांडले व ते त्याने या काळात मांडले असे निश्चयाने सांगून त्याचे बरेवाईट परिणाम अमके झाले, असे सांगता येत नाही.
महाभारत आणि स्मृती यांनी सांगितलेल्या धर्मशास्त्राचे स्वरूप आपण वर पाहिले. आता पुराण-प्रतिपादित धर्मशास्त्र पाहू आणि मग ऐतिहासिक घटनांच्या आधारे या काळच्या सामाजिक उत्कर्षाची व त्याच्या अखेरीस - म्हणजे यादवांच्या अखेरीस - जो समाजाचा अपकर्ष झाला त्याची कारणमीमांसा करण्याचा यावच्छक्य प्रयत्न करू.
बौद्ध-जैनांचे देणे
जाता जाता एक महत्त्वाची गोष्ट सांगून ठेवावी असे वाटते. बौद्ध धर्माने किंवा जैन धर्माने भारताचा नाश केला अशी सरसकट विधाने करणे युक्त नाही. प्रत्येक धर्मात काही थोर तत्त्वे असतात, तशा काही विकृतीही असतात. हिंदुधर्मही याला अपवाद नाही. त्यातील विकृतीमुळेच भारताचा अधःपात झाला, हे पुढे दाखविले आहे. असे असताना बौद्ध किंवा जैन धर्माने नाश केला, असे कसे म्हणता येईल ? या दोन्ही धर्मात महापराक्रमी राजे होऊन गेले. तेव्हा त्यांनी क्षात्रधर्माचा नाश केला असेही म्हणता येणार नाही. दोन्ही धर्मांची प्राचीन काळी विद्यापीठे होती. त्यांत पारमार्थिकाप्रमाणेच ऐहिकाचाही अभ्यास होत असे. कोरीव लेण्यांची कला तर बव्हंशी बौद्धांची आहे. जैनांनी भारतीय व्यापाराला जी प्रतिष्ठा मिळवून दिली तिला तोड नाही. अलीकडच्या काळात डॉ. आंबेडकर ही बौद्धधर्माची निस्तुल अशी देणगी आहे. नवबौद्धांची अस्मिता जागृत करण्याचे श्रेय त्या धर्मालाच आहे. असे असताना सरसकट विधाने करणे हे अनैतिहासिक होईल. असो. आता पुराणांचा विचार करू.
पुराण-धर्म
पुराणांची रचना साधारणतः इ. सनाच्या चौथ्या शतकापासून सुरू झाली, असे
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१९२
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६५
धार्मिक जीवन