Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
१६०
 

राजशासन, व्यापार, विद्या, कला या सर्व क्षेत्रांत नवव्या दहाव्या शतकापर्यंत महाराष्ट्रात कर्तृत्वाची जोपासना चांगली होत होती. त्या सुमारास बौद्ध धर्म एकंदर भारतातूनच लुप्त झाला. आणि जैन धर्माचे मोठे पुनरुत्थान झाले असे नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात या दोन पंथांनी काही वळण लावले असे म्हणता येईल असे दिसत नाही.

धर्मग्रंथ
 सातवाहन ते यादव या कालखंडाचा धार्मिक इतिहास निश्चित करण्यास आधारभूत धर्मग्रंथ म्हणजे महाभारत, स्मृती व पुराणे हे होत. यांतील बहुतेक सर्व ग्रंथांची रचना या काळात झाल्याचे दिसत नाही. तरी आपण हे ध्यानात ठेविले पाहिजे की अखिल भारतावर त्या काळात या उत्तरेतील ग्रंथांचेच वर्चस्व होते. म्हणून भारतातल्या कोणत्याही प्रांतातील धार्मिक जीवनाचा अभ्यास करताना याच ग्रंथांकडे पाहावे लागते. याच्या जोडीला नाणी, शिलालेख व तत्कालीन इतर वाङ्मय यांवरून अर्वाचीन काळात या कालखंडाचा जो इतिहास पंडितांनी निश्चित केला आहे त्याचा आधार घेऊन, ग्रंथांतील तत्त्वे, सिद्धान्त, आज्ञा या व्यवहारात कितपत उतरत होत्या हे पाहून, महाराष्ट्राच्या धार्मिक जीवनाचे स्वरूप वर्णिले पाहिजे. वर सांगितलेच आहे की महाभारताची रचना सातवाहनांच्या प्रारंभीच्या काळातच झालेली आहे. स्मृतींच्या रचनेचा प्रारंभ साधारण त्याच सुमारास झालेला आहे. मनुस्मृतीची रचना इ. पू. दुसऱ्या शतकात झाली असे बऱ्याच पंडितांचे मत आहे. यानंतर एक किंवा दोन शतकांच्या अंतराने याज्ञवल्क्य, नारद, बृहस्पती, पराशर, वसिष्ठ, देवल यांच्या स्मृती होत राहिल्या. आठव्या शतकाच्या अखेरीस नव्या स्मृती होण्याचे बंद झाले व तेथून निबंधांचा काळ सुरू झाला. अनेक पंडितांनी मनु याज्ञवल्क्यांच्या स्मृतीवर टीका लिहिल्या व इतर अनेकांनी निरनिराळ्या स्मृतींच्या व महाभारतासारख्या ग्रंथाच्या आधारे धर्मशास्त्रीय ग्रंथ तयार केले. या सर्व ग्रंथांना निबंध असे म्हणतात. विश्वरूप, मेधातिथी, विज्ञानेश्वर, अपरार्क, हेमाडी हे निबंधकार होत. यांतील शेवटचे तिघे महाराष्ट्रीय असल्यामुळे आपल्या दृष्टीने त्यांचे महत्त्व जरा जास्त आहे. इ. सनाच्या चौथ्या शतकापासून पुराणांच्या रचना होऊ लागल्या. वायू, ब्रह्मांड, विष्णू, मत्स्य, मार्कंडेय इ. पुराणांची रचना चौथ्या ते सहाव्या शतकापर्यंत झाली. विष्णुधर्मोत्तर पुराण, अग्निपुराण, गरुडपुराण ही त्यानंतरच्या काळातली होत. भागवत पुराण हे काहींच्या मते पाचव्या व इतरांच्या मते दहाव्या अकराव्या शतकातले आहे. हे सर्व काळ अंतर्गत पुराव्यावरून व इतरत्र त्यांचे जे उल्लेख येतात त्यावरून अनुमानाने ठरविलेले आहेत. त्यांच्या विषयी एकवाक्यता मुळीच नाही. तरी सातवाहन ते यादव या कालखंडातलेच हे सर्व धर्मग्रंथ आहेत, याविषयी वाद नाही. आणि त्यांच्याच आधारे भारतातील सर्व प्रांतांत धर्मनिश्चय केला जात होता, हेही निर्विवाद आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या धार्मिक जीवनास त्यांनीच वळण लावले होते यात शंका नाही.