त्यांच्या मागे काही तत्त्व असते, कालांतराने ते तत्व लोप पावते व मग केवळ जड आचार म्हणजे कर्मकांड शिल्लक राहते. पण लोक त्यालाच धर्म मानीत असल्यामुळे त्याचा त्याग करण्यास तयार नसतात. आणि त्यामुळे धर्माला अत्यंत विकृत रूप येऊन समाजाचा ऱ्हास होतो. तेव्हा नीतितत्वे व आचार यांचा या दृष्टीने अभ्यास केल्यावाचून समाजाच्या धार्मिक जीवनाची खरी कल्पना येणार नाही.
पंथभेद
प्रत्येक धर्मात तत्वज्ञान, नीती, आचार, देवता, उपासनामार्ग यांविषयी मतमतांतरे निर्माण होऊन त्यावरून पंथभेद निर्माण होतात. असे पंथ वा संप्रदाय निर्माण होणे अटळच असते. अशा वेळी भिन्न पंथांतील समभूमी कोणती, समान अधिष्ठान कोणते, एकं सत् कोणते ते सांगून, भिन्न मतांचा समन्वय करून, त्या पंथांचे ऐक्य साधणारे पुरुष निर्माण झाले नाहीत तर समाज शतधा भंगून जातो. ख्रिस्ती धर्मातील कॅथॉलिक- प्रोटेस्टंट, इस्लाम धर्मातील शिया-सुनी या पंथांतील घनघोर संग्राम प्रसिद्धच आहेत. भारतातही वैदिक, बौद्ध, जैन, वैष्णव, शीख, लिंगायत असे पंथ निर्माण झाले होते व त्यांच्यांत तीव्र संघर्षही झाले होते. पण सहिष्णुवृत्तीची जोपासना करून या पंथांचा समन्वय करणारे धर्मधुरीणही येथे प्रत्येक युगात निर्माण झाले होते. त्यांच्या प्रयत्नांचे यशापयश धार्मिक जीवनाच्या अभ्यासकाने पाहिले पाहिजे. सातवाहन ते यादव या कालखंडाच्या दृष्टीने तर या पंथांच्या व संप्रदायांच्या अभ्यासाचे महत्व फार आहे. बौद्ध व जैन हे जे अवैदिक धर्मपंथ त्यांचा सातवाहनांच्या आधीच्या काळात फारच उत्कर्ष झाला होता. आणि भारताच्या उत्कर्षाचे वा अपकर्षाचे श्रेय कित्येक पंडित या पंथांनाच देतात. म्हणून त्यांचे मूल्यमापन करणे अवश्य आहे. शैव-वैष्णवांतील संवर्ष इतका नसला तरी जवळ जवळ तितकाच महत्वाचा आहे. समाजाच्या एकतेला त्यामुळे तडे गेले होते, असे इतिहासवेत्ते सांगतात. तेव्हा या सर्व पंथोपंथांचे कार्य व महत्व यांचा विचार संस्कृतीच्या दृष्टीने फार अवश्य ठरतो.
धार्मिक जीवनाच्या कक्षेत कोणकोणत्या विषयांचा अंतर्भाव होतो ते येथवर सांगितले. तत्वज्ञान, नीती व आचार ही धर्माची तीन अंगे आणि प्रवृत्ती, निवृत्ती, शब्दप्रामाण्य, बुद्धिप्रामाण्य, धर्माची परिवर्तनीयता, त्यातील तत्वांची सापेक्षता व निरपेक्षता म्हणजेच त्रिकालाबाधितत्व, धर्मामध्ये निर्माण होणारे भिन्नभिन्न पंथ वा संप्रदाय त्यांचे परस्परांतील संघर्ष, त्याविषयीची समाजातील सहिष्णुवृत्ती, सर्व धर्ममतांचा समन्वय साधण्याचे धोरण हे व या प्रकारचे अनेक घटक धर्मविचारात अंतर्भूत होतात. ते सर्व दृष्टीपुढे ठेवून सातवाहन ते यादव या कालखंडातील महाराष्ट्राच्या धार्मिक जीवनाचा आता अभ्यास करावयाचा आहे.
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१८०
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५३
धार्मिक जीवन