Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४५
स्वायत्त संस्था आणि लोकसंघटना
 

निर्माण होणे शक्य नव्हते, या म्हणण्याला फारसा अर्थ नाही. कारण अखिल चीन एक आहे ही भावना इ. पू. ३००० वर्षापासून त्या भूमीत जोपासली गेली होती. आणि त्या काळापासून परवाच्या मांचू राज्यापर्यंत सतत चारपाच हजार वर्षे चीनला एकछत्री साम्राज्य निर्माण करणे शक्य झाले होते. आणि ते नाममात्र साम्राज्य नव्हे, तर प्रत्यक्ष शासन करणारे साम्राज्य. भारतात मौर्यकाळ सोडला तर अखिल भारत एकछत्र असा कधीही झाला नाही. रामायण, महाभारत, पुराणे यांनी भारताच्या भिन्न भिन्न प्रदेशांत सांस्कृतिक एकात्मता निर्माण केली होती. पण अशा एकात्मतेतून राष्ट्रनिष्ठा जोपर्यंत निर्माण होत नाही, निश्चित असे आपपर भाव लोकांच्या ठायी पोसले जात नाहीत तोपर्यंत त्या एकात्मतेतून सामर्थ्य निर्माण होत नाही. असे सामर्थ्य येथे निर्माण झाले नाही याचे कारणही तेच. हिंदूंचे धर्मशास्त्र ! अखिल भारताचे एकछत्री साम्राज्य करावे, राजांनी चक्रवर्तित्वाची आकांक्षा धरावी, हिमवत् समुद्रान्तरम् । एकराज्य करावे असा उपदेश त्या धर्मशास्त्रज्ञांनी केला, पण तो राजांना. या भूमीची निष्ठा लोकांत जोपासण्याचे त्यांनी मनातसुद्धा आणले नाही. कारण, सर्व भारतीय ते एक, असे तत्त्वज्ञान त्यासाठी त्यांना प्रतिपादावे लागले असते. आणि त्याचेच त्यांना वावडे होते. सर्व भारतीयांना एकपदावर आणावयाचे तर काही किमान समआचार, समउपासना, समबंधने, समन्याय, ब्राह्मणांपासून अंत्यजापर्यंत सर्वांना समभूमी, असा धर्म त्यांना उपदेशावा लागला असता. आणि कालत्रयी अशी समता समाजात येऊ द्यावयाची नाही, हे तर हिंदुधर्मशास्त्राचे प्राणतत्त्व होते. प्रजासत्ताक राज्य म्हटले किंवा राजाच्या सत्तेखालचे राष्ट्र म्हटले तरी त्यात सामर्थ्य निर्माण करावयाचे असेल तर सर्व लोकांना, प्रत्येक व्यक्तीच्या चित्ताला आवाहन करणारे कोणते तरी तत्त्व आधाराला असावे लागते. याचाच अर्थ असा की व्यक्तीला व्यक्ती म्हणून काही प्रतिष्ठा आहे, या समाजाविषयीचे काही ध्येय असून त्याची जबाबदारी तिच्या शिरी, क्षत्रिय राजा, ब्राह्मण गुरू यांच्याइतकीच आहे, त्याच्या उन्नतिअवनतीला तीही त्यांच्याइतकीच उत्तरदायी आहे हा लोकसंघटनेचा आद्य सिद्धान्त समाजधुरीणांना मान्य असावा लागतो. हिंदुसमाजधुरीणांना हा सिद्धांत कधीच मान्य नव्हता. व्यक्तीला व्यक्ती म्हणून मान देण्यास ते कधीच तयार नव्हते. ती ब्राह्मण आहे की क्षत्रिय, की शूद्र की अंत्यज, याची ते प्रथम चौकशी करणार ! असा समाज संघटित होणे कधीही शक्य नाही.

किमान समता
 लोकसंघटना म्हटली की, व्यक्तीची व्यक्ती म्हणून प्रतिष्ठा आणि काही किमान समता ही अपरिहार्य आहेत. मुस्लिम समाजात कुराण, महंमद पैगंबर, इस्लाम धर्म असे मानबिंदू सर्वांना सम आहेत. यांच्यावर आघात झाला तर तो प्रत्येक व्यक्तीवर आघात झाला असा त्या समाजात अर्थ होतो. ज्या मशिदीत खलिफा जाईल त्याच