आनुवंशिकता
आनुवंशिकतेवरील या अंधश्रद्धेमुळे येथे राजसत्ता तर आनुवंशिक झालीच, पण राष्ट्र, विषय, भुक्ती आणि ग्राम या विभागांवरील राजाने नेमावयाचे अधिकारी हेही आनुवंश पद्धतीनेच नेमावे असा शास्त्रकारांनी दण्डक घालून दिला. या प्रत्येक विभागात स्वायत्त सभा होत्या, पण त्यावरचे सर्व अधिकारी, राष्ट्रपतीपासून पाटला पर्यंतचे सर्व अधिकारी, राजाने नेमलेले असत. राष्ट्रकूटांच्या इतिहासात डॉ. आळतेकरांनी हे पदोपदी स्पष्ट केले आहे. डॉ. वेणीप्रसाद, डॉ. रामशरण शर्मा यांनी हेच मत मांडले आहे. बिंबिसार राजाच्या काळी ऐंशी हजार ग्रामिक साम्राज्यात होते. त्या सर्वांची नेमणूक सम्राट करीत असे. या नेमणुका प्रारंभापासून वंशपरंपरेने होत असत. तशा त्या व्हाव्या असे शास्त्रच होते. म्हणजे ज्या ग्रामसभेचा एक लोकायत्त संस्था म्हणून गौरव केला जातो तिचा मुख्य जो ग्रामपती तो वंशपरंपरेने आलेला एक राजपुरुष होता हे आपण ध्यानात ठेविले पाहिजे. महासामंत, राज्यपाल, सेनापती, पुरपाल येथपासून ग्रामपतीपर्यंत सर्व अधिकारी आनुवंशाच्या पद्धतीने आपल्या पदावर येण्याच्या या पद्धतीतूनच पुढे सरंजामशाही निर्माण झाली, असे डॉ. रामशरण शर्मा यांनी म्हटले आहे. (आसपेक्टस् ऑफ पोलिटिकल आयडियाज् अँड इन्स्टिटयूशन्स् इन् एन्शंट इंडिया, पृ. २०६ - २२५ ) ते म्हणतात, ग्रामपती हा गुप्तकाळातच सरंजामदार होऊ लागला होता. तो स्वतःची कामेसुद्धा वेठबिगारीने करून घेई. यामुळे ग्रामीण प्रदेशात शेतकऱ्याची प्रतिष्ठा फारच खालावली होती. ग्रामसंस्थांचे सर्व अधिकारी पिढिजात असत, असे चिंतामणराव वैद्य यांनीही म्हटले आहे ( मध्ययुगीन भारत, भाग १ ला, पृ. १८८ ). हे अधिकारी पिढिजात असत आणि वर एकदोन ठिकाणी सांगितल्याप्रमाणे, त्यांच्याजवळ स्वतंत्र सेना असत. त्या असणे त्या काळात अपरिहार्यच होते. पण पिढिजात सत्ता आणि हाताशी स्वतंत्र सेना अशा दोन शक्ती वश असणारा अधिकारी स्वायत्त संस्थांची बूज किती राखील हे कळतेच आहे.
हक्कांची जाणीव नाही
दोन तीन हजार वर्षे येथे लोकायत्त संस्था नांदत असून त्या प्रबल न होता हळूहळू क्षीणबलच होत गेल्या याला वर्णविषमता व पिढिजात अधिकारपदे यांपेक्षाही एक महत्त्वाचे कारण आहे. समाजाची प्रगती होण्यासाठी त्यातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात दोन जाणिवा कायम जागृत असणे अवश्य असते. एक कर्तव्याची जाणीव आणि दुसरी हक्काची जाणीव. कर्तव्याची जाणीव नसेल तर माणसे पशू होतात आणि हक्काची जाणीव नसेल तर ते मोनजातीचे गरीब मुके प्राणी होतात. भारतात हिंदुसमाजाला हळूहळू ही दुसरी अवस्था आली. कारण धर्मशास्त्रकारांनी त्याला फक्त कर्तव्यांचा उपदेश केला, पण जपणुकीचा उपदेश कधी एका अक्षरानेसुद्धा केला नाही. प्राचीन काळी राज-
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१६७
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
१४०