Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



७.
स्वायत्त संस्था आणि लोकसंघटना
 



स्थानिक स्वराज्ये
 सातवाहन ते यादव या कालखंडात महाराष्ट्रातील शासनाचे रूप काय होते ते गेल्या प्रकरणात आपण पाहिले. या दीडहजार वर्षात येथे अखंड राजसत्ताच होती आणि तिच्यावर घटनात्मक अशी कसलीही बंधने नसून ती पूर्णपणे अनियंत्रित होती हे आपण ध्यानी घेतले. मात्र तत्त्वतः ती राजसत्ता अनियंत्रित असली तरी तिच्यावर धर्माची म्हणजेच विवेकाची अनेक बंधने होती आणि बहुसंख्य राजे व त्यांचे राजपुरुष ती मनोभावे पाळीत असत हाही विचार तेथे मांडला. आता यानंतर राजसत्तांकित अशा या देशात ज्या स्वायत्त वा लोकायत्त संस्था होत्या त्यांचा विचार करावयाचा आहे. राजकारभाराच्या सोयीसाठी त्या काळी जनपद, राष्ट्र, विषय, भुक्ती व ग्राम असे राज्याचे विभाग केलेले असत. आणि त्यांचा कारभार बव्हंशी लोकायत्त होता, असे भारताचे इतिहासकार सांगतात. ग्रामापासून जनपदापर्यंत चालणारी जी स्थानिक स्वराज्ये, त्यांचा भारताच्या प्राचीन इतिहासात अतिशय गौरव केलेला आढळतो. त्यांतही ग्रामपंचायती किंवा ग्रामसभा यांच्या वैभवाचे नेहमी अत्युक्तीने वर्णन केले जाते. राधाकुमुद मुकर्जींसारखे पंडित तर या ग्रामसभा म्हणजे भारतीय संस्कृतीचा मूलाधार होय असे म्हणतात. भारतावर अनेक आक्रमणे झाली, हजारो वर्षे सारखी परचक्रे येत राहिली, पण भारतीय संस्कृतीला ती स्पर्शही करू शकली नाहीत, असे विधान करून याचे सर्व श्रेय या स्थानिक स्वराज्यांना आहे, असे मत त्यांनी मांडले आहे. मुस्लिम आणि इंग्रज यांच्याही राजवटीत भारतीय संस्कृती अबाधित राहिली