Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१५७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
१३०
 

उलट, ब्राह्मण, अनाथ, अपंग, यांना दाने दिली आणि तेथील राजसिंहेश्वराच्या देवळातील धन कोणी राजाने लुटले होते ते परत देवालयाच्या भांडारात भरून टाकले. राष्ट्रकूट सम्राट ध्रुवधारावर्ष व गोविंद तिसरा यांच्या उत्तरेतील स्वाऱ्यांचे वर्णन करून पुढे डॉ. आळतेकर म्हणतात, या मोहिमा म्हणजे केवळ दिग्विजय होते. यामुळे कीर्ती व कारभार यांखेरीज राष्ट्रकूट सम्राटांना कोणताच लाभ झाला नाही. कल्याणीच्या चालुक्यवंशात व देवगिरीच्या यादव घराण्यात सोमेश्वर, विक्रमादित्य, भिल्लम, सिंघण, कृष्ण असे अनेक पराक्रमी सम्राट होऊन गेले. त्यांनी कावेरीपर्यंत दक्षिण जिंकली होती व उत्तरेत गुजराथ, माळवा, कनोज येथपर्यंतही काही काळ आपले अधिराज्य प्रस्थापिले होते. पण ते अधिराज्य म्हणजे केवळ सम्राटाला मानवंदना या स्वरूपाचे होते. त्या राजांची भूमी या सम्राटांनी अपहरिली असा त्याचा अर्थ नाही.
 पण सामान्यतः चक्रवर्तिपदाचा हा अर्थ असला तरी अनेक वेळा तो प्रत्यक्षात अगदी बदलून जात असे. आणि तसे होणे अपरिहार्यच होते. चालुक्य व राष्ट्रकूट सम्राट यांनी आंध्र व गुजराथ प्रांतांत आपले भाऊ, पुतणे यांना राजपदी बसविले याचा अर्थच असा की त्या प्रदेशातील मूळ राज्ये त्यांनी नष्ट केली आणि ते प्रदेश आपल्या साम्राज्याला जोडले. चालुक्य व राष्ट्रकूट यांच्या या शाखांनी त्या प्रदेशात तीनचार शतके राज्य केले. तेव्हा तेथला मूळ राजवंश समूळ नष्ट झाला हे उघडच आहे. यादव सम्राट सिंघण व महादेव यांनी कोल्हापूरचे व उत्तर कोकणचे शिलाहार यांची राज्ये जिंकली तेव्हा येथील राजांना पदच्युत करून प्रदेश खालसा करून टाकले. तेव्हा या बाबतीत हे राजपुरुष शास्त्राज्ञा श्रद्धेने पाळीत असतच असे नाही.
 हे साम्राज्यविस्ताराविषयी झाले. पण स्वतंत्र राज्यस्थापना ते करीत तेव्हा तर मूळ राजवंश कायम ठेवण्याचा प्रश्न उद्भवणेच शक्य नव्हते. कारण तो नष्ट केल्यावाचून नवा राजवंश प्रस्थापित होणे शक्यच नसते. राष्ट्रकूटवंश संस्थापक दंतिदुर्ग, उत्तर चालुक्य घराण्याचा संस्थापक तैलप, यादवांचा भिल्लम या राजांनी महाराष्ट्रात राज्ये स्थापन केली त्या वेळी बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट, कलचूरी यांची घराणी नष्ट करण्यावाचून त्यांना गत्यंतरच नव्हते. प्रत्येक नव्या राजवंशाने आधीच्या घराण्याचा उच्छेद करूनच सत्ता मिळविलेली आहे. तेव्हा स्वतंत्र राज्य स्थापिताना किंवा साम्राज्यविस्तार करताना प्राचीन काळी धर्मशास्त्र काटेकोरपणे पाळले जात असेच असे म्हणता येणार नाही.

थोर संस्कृती
 पण एवढे मात्र खरे की अशा रीतीने शस्त्रबळाने त्यांनी राज्ये जिंकली तरी त्या प्रदेशातील प्रजेचा कधीही छळ केला नाही. त्यांच्याही बाबतीत 'राजा प्रकृतिरंजनात् ।' 'प्रजासुखे सुखं राज्ञः, सुपालितप्रजो यः स्यात् सर्वधर्मविद् एव सः । हे परमोदार ध्येयच