त्यांच्या नंतर या भूमीत चालुक्यांची सत्ता प्रस्थापित झाली. हे चालुक्य राजे पूर्वीच्या राजांप्रमाणे तत्त्वतः पूर्ण अनियंत्रित असूनही, प्रजासुखे सुखं राज्ञः । याच उदात्त तत्त्वाने चालत असत, असा त्या वेळी भारतात येऊन गेलेला सुप्रसिद्ध चिनी प्रवासी ह्यूएनत्संग यानेच त्यांचा गैरव करून ठेवलेला सापडतो. ताम्रपट, शिलालेख यापेक्षा अशा बाबतीत हा पुरावा अर्थातच ग्राह्य होय. कारण ताम्रपट, शिलालेख हे त्या त्या राजांनी किंवा त्यांच्या वंशजांनी किंवा त्यांच्या सचिवांनी वा आश्रितांनी कोरविले असल्यामुळे त्यांत राजपुरुषांची प्रशस्तीच फक्त गायिलेली असण्याचा संभव फार. काही ताम्रपटांत हीन, अधोगामी अशा राजांचा तसा निर्देश केलेलाही आढळतो. राष्ट्रकूट राजा गोविंद दुसरा याचा ' तो विलासप्रिय व भोगासक्त होता व प्रजेच्या कल्याणाची चिंता मुळीच वहात नसे' असा उल्लेख राष्ट्रकूट राजा कृष्ण ३ रा याच्या कऱ्हाडच्या ताम्रपटात आढळतो ( भांडारकर, कलेक्टेड वर्क्स, खंड ३ रा, पृ. २८७ ). राष्ट्रकूट राजा कर्क पहिला याच्याही कऱ्हाडच्या ताम्रपटात तसे वर्णन आहे ( डॉ. आळतेकर, राष्ट्रकूट, पृ. ५० ). यामुळे लेखांचा पुरावा अगदी अविश्वसनीय मानणे युक्त नाही. तरी परकी प्रवाशांनी केलेले वर्णन हा जास्त सबळ पुरावा होय हे मान्य केलेच पाहिजे.
अखंड चिंता
ह्युएनत्संग हा सर्व भारतात व महाराष्ट्रातही हिंडला होता. त्याने स्वतः सत्याश्रय पुलकेशी याची भेट घेतली होती. या आधारे तो लिहितो, ' हा राजा क्षत्रिय असून तो मोठा उदार व दयाळू आहे. तो दानशूर व परोपकारी असून प्रजेची अखंड चिंता वाहतो, त्यामुळे त्याची प्रजा त्याच्यावर अनुरक्त असून प्रजाजन त्याची मनोभावे सेवा करतात. आपल्या प्रजेच्या शौर्यधैर्याचा राजालाही मोठा अभिमान आहे ' (भांडारकर, कलेक्टेड वर्क्स, पृ. ७१, ७२ ). ह्यूएनत्संग याने भारतातल्या अनेक राजांविषयी व त्यांच्या प्रजाजनांविषयी अशाच प्रकारचे उद्गार काढलेले आहेत. माळव्याच्या राज्याविषयी लिहिताना तो म्हणतो, ' येथील लोक बुद्धिमान, शुद्ध भाषा बोलणारे आणि सुशिक्षित असे आहेत. ईशान्येकडे मगधात व नैर्ऋत्येकडे माळव्यात सद्गुणांची चहा आहे व तेथे भूतदयेला अग्रमान मिळत असतो. येथला ६० वर्षापूर्वी होऊन गेलेला राजा शिलादित्य हा तर आपल्या राज्यात माशीचीही हिंसा न होईल अशी खबरदारी घेई. हत्तीघोड्यांनाही तो पाणी गाळून पाजीत असे. कोणीही प्राणिहत्या करू नये असा तो कळकळीचा उपदेश करी.' दुसऱ्या एका ठिकाणी त्याने म्हटले आहे की ' भारतातील क्षत्रिय व ब्राहाण यांचे वर्तन निष्कलंक आणि अगदी साधे असून त्यांच्यांत डामडौल नसतो. त्यांची राहणी काटकसरीची असते. ' सम्राट श्रीहर्षाच्या औदार्याचे, प्रकृतिरंजनाचे व धर्मनिष्ठेचे ह्यूएनत्संगाने जे वर्णन केले आहे त्यावरून त्याचे राज्य म्हणजे खरेखुरे रामराज्य होते असे म्हणावयास
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१५४
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१२७
राजसत्ता