Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१४६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
११९
राजसत्ता
 

पुत्र स्तंभ याला बाजूस सारून दुसरा पुत्र गोविंद यास राजपद दिले. गोविंद सत्तारूढ झालाही. पण नंतर स्तंभाने अनेक सामंत व अधिकारी यांच्या साह्याने उठाव केला. पण त्याचा पराभव झाला. राजपद गोविंदाकडेच राहिले. पण यादवी टळली नाही. काही घटनात्मक व्यवस्था असती किंवा लोकमत प्रभावी असते तर दर पिढीला यादवी झाली नसती. महाराष्ट्रात वा अन्य प्रांतांत या काळी लोकसत्ता होती असे कोणी म्हणत नाही. पण ग्राम, विषय, राष्ट्र, भुक्ती, आहार हे जे राज्याचे कारभारासाठी केलेले विभाग तेथे लोकायत्त कारभार होता असे सांगितले जाते. ग्रामीण लोकायत्ततेचा तर फारच गौरव केला जातो. त्याचप्रमाणे व्यापारी, ब्राह्मण व नगरजन यांचेही संघ असून ते बलशाली व प्रभावी होते असे इतिहासवेत्ते म्हणतात. त्यांचा प्रभाव किती होता, राजसत्तेवर ते कितपत नियंत्रण घालू शकत होते याचा विचार पुढे करू. पण राजपदी कोण यावे, वारस म्हणून कोणाला मान्यता द्यावी, आपल्या प्रदेशावर कोणती सत्ता चालू द्यावी यासंबंधी निर्णय करण्याचा कसलाही अधिकार लोकांना नव्हता आणि या विषयात हस्तक्षेप करण्याचा ते प्रयत्नही कधी करीत नसत हे अगदी स्पष्ट आहे. अपवादालासुद्धा लोकमतप्रभाव कधी दिसला नाही.
 गोविंदाचा मुलगा अमोघवर्ष राज्यावर आला तेव्हा अवघा सहा वर्षांचा होता. त्यामुळे मुखत्यार म्हणून गुजराथेतील राष्ट्रकूट शाखेचा राजा व आपला भाऊ इंद्र याचा मुलगा कर्कसुवर्णवर्ष याची गोविंदाने आधीच नेमणूक केली होती. पण तरीही यादवी व कलह टळले नाहीत. सामंत, सेनाधिकारी, शेजारचे सत्ताधीश सर्वांनीच उठावणी केली आणि त्यांनी अमोघवर्षाला काही काळ पदच्युत केले. पुढे त्यांच्या- त्यांच्यातच कलह सुरू झाले. तीनचार वर्षे ही बंडाळी चालू होती. पण लवकरच कर्काने सर्व बंडखोरांचे पारिपत्य करून अमोघवर्षाला राज्यारूढ केले. राष्ट्रकूटांच्या कारकीर्दीत शेवटपर्यंत या तऱ्हेचे कलह चालूच होते. लोकांच्या स्वायत्त संस्था त्यांना आळा घालू शकल्या नाहीत.
 राष्ट्रकूटानंतर कल्याणीचे चालुक्य व देवगिरीचे यादव या दोन घराण्यांनी मिळून महाराष्ट्रावर सुमारे तीन साडेतीनशे वर्षे राज्य केले. या दोन घराण्यांच्या सत्ताकाळात राष्ट्रकूटांप्रमाणे वारसाची युद्धे सतत झाली नाहीत. पण तसे प्रसंग आले तेव्हा ती टळलीही नाहीत. चालुक्यराज आहवमल्ल सोमेश्वर याला सोमेश्वर २ रा, विक्रमादित्य व जयसिंह असे तीन पुत्र. आहवमल्लाच्या मृत्यूनंतर गादी सोमेश्वरला मिळाली. पण लवकरच विक्रमादित्याशी त्याचा कलह सुरू झाला व तो पदच्युत होऊन विक्रमादित्य सत्तारूढ झाला. त्याच्या कारकीर्दीच्या अखेरीस जयसिंहही बंडाळी करून उठला होता. पण त्याचा पराभव झाला. यादवांचा पराक्रमी राजा कृष्ण याने स्वतःला मुलगा असूनही गादी आपल्या भावाला-महादेवाला दिली व त्याने आपल्या नंतर कृष्णाचा मुलगा रामदेव याला राज्य न देता आपला मुलगा आमणदेव याला दिले. साहजिकच संघर्ष अटळ झाला. रामदेवरावाने कपटाने आमणदेवाचा खून केला आणि राज्य ताब्यात घेतले.