Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१३८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१११
राजकीय कर्तृत्व
 

सळ व काकतीय यांच्याविषयीचे पूर्वापार धोरणच पुढे चालू ठेवले. या सत्तांशी झालेल्या संघर्षात कधी कधी त्यांचा पराजय होई. पण बव्हंशी ते यशस्वीच होत. पण वर सांगितल्याप्रमाणे हिंदुसत्तांचा समग्र ग्रास घेणारी दिल्लीची मुस्लिम सत्ता डोळ्यांसमोर दिसत असताना या यशाचे कौतुक वाटत नाही. माळव्याचा राजा जगत्तुंग यावर कृष्णाने प्रचंड विजय मिळविला हे खरे. पण त्यामुळे जगत्तुंग कमजोर झाला व दिल्लीचा सेनापती बल्बन याने लगोलग स्वारी करून माळव्याची धूळधाण करून टाकली. चहू दिशांना सतत आक्रमण करून साम्राज्यविस्तार करण्याची आकांक्षा मनात बाळगणाऱ्या या यादवराजांच्या, त्या मुस्लिम सत्तेशी मुकाबला करावा, असे कधी मनातही आले नाही. असो. कृष्णानंतर गादीवर आलेला महादेव याने ठाण्याच्या शिलाहारांचा पराभव करून त्यांचे राज्य खालसा केले. कोल्हापूर राज्य सिंघणाने पूर्वीच केले होते. याच वेळी हनगळच्या कदंब राजाने उठाव केला होता. तोही यादव सेनेने मोडून काढला. महादेवाच्या कारकीर्दीत देवगिरीचे वैभव वाढले यात शंका नाही. 'देवगिरी हे त्रिभुवनसौंदर्याचे सारसर्वस्व आहे. तेथील घरे मेरुपर्वताच्या शिखराशी स्पर्धा करतात' असे या नगरीचे वर्णन केलेले आढळते. पण याच वेळी तिच्यावर दिल्लीच्या कृष्णछाया पडू लागल्या होत्या याची कोणाला कल्पनाही नव्हती. ही गोष्ट तत्कालीन राजनीतीला मोठी लांच्छनास्पद अशी वाटते.

खग्रास ग्रहण
 महादेवानंतर त्याचा मुलगा अमणदेव गादीवर आला. वास्तविक कृष्णाचा पुत्र रामदेवराव याचा गादीवर खरा हक्क होता. अमणदेवाचा हक्कही नव्हता आणि त्याच्या अंगी सामर्थ्यही नव्हते. त्यामुळे रामचंद्राने कपटव्यूह रचून त्याचा पाडाव केला व त्याचे डोळे काढून त्यास कैदेत टाकले आणि आपले स्वामित्व प्रस्थापित केले. हा रामचंद्र यादव मोठा कर्ता पुरुष होता. पण वरंगळ व होयसळ यांना पुन्हा पुन्हा नमविण्यातच त्याने आपली सर्व शक्ती खर्च केली. दक्षिणेत अधिराज्य स्थापन केल्यावर तो मोठ्या धाडसाने उत्तरेकडे वळला व भंडारा, जबलपूर हे प्रदेश जिंकून थेट बनारसवर चालून जाऊन त्याने ती पुण्यनगरी जिंकली. हा बनारसचा आघात म्हणजे दिल्लीवरच आघात होता. पण तेथे या वेळी सर्वत्र अंदाधुंदी माजली असल्यामुळे मुस्लिमसत्तेशी रामदेवरावाचा प्रत्यक्ष मुकाबला झाला नाही. हे सर्व विजय रामदेवरावाने १२९२ पर्यंत मिळविले. या वेळी यादवसत्ता खरोखरीच वैभवाच्या शिखरावर होती. पण लवकरच तिला ग्रहण लागले. १२९६ साली अल्लाउद्दिनाने देवगिरीचा पाडाव केला व रामदेवरावाला दिल्लीचा मांडलिक करून टाकले. याआधी पन्नास वर्षे सूफी पंथाचे अनेक अवलिये दक्षिणेत इस्लामचा प्रसार करून हिंदुसत्ता पोखरून टाकण्याचा उद्योग करीत होते. पण त्याची दखल कोणी घेतली नव्हती. हेमाडीसारखे पंडित, राजकारणी, मुत्सद्दी हे देवगिरीची इन्द्राच्या अमरावतीशी तुलना करण्यात व