Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१२२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
९५
राजकीय कर्तृत्व
 


सम्राट प्रवरसेन
 विदिशेचे भारशिव हे राजघराणे वाकाटकांचे समकालीन होय. हे घराणे नागवंशी असून पौनीभंडारा येथे सापडलेल्या त्यांच्या शिलालेखावरून ते मूळचे विदर्भातले असावे असे मिराशी म्हणतात. भारशिव हे वाकाटकांप्रमाणेच पराक्रमी असून त्यांनी दहा अश्वमेध केले होते. आपल्या सत्तेला बळकटी आणण्याकरिता प्रवरसेनाने भारशिव नृपती भवनाग याच्या कन्येला आपला पुत्र गौतमीपुत्र यासाठी मागणी घालून सून करून घेतली. प्रवरसेनाने साठ वर्षे राज्य केले ( इ. स. २७५ - ३३५ ). या प्रवरसेनाचा डॉ. जयस्वाल यांनी फार गौरव केला आहे. अखिल भारतावर हिंदूचे साम्राज्य असावे व त्यांत धर्मशास्त्रांना अग्रमान दिला जावा, ही कल्पना त्याने निश्चयाने प्रसृत केली, असे ते म्हणतात. त्याचप्रमाणे संस्कृत भाषा, वर्णाश्रम धर्म व हिंदूंच्या विद्याकला यांच्या पुनरुज्जीवनाचे श्रेय त्यांच्या मते वाकाटकांना आहे. बरेच इतिहास पंडित ते श्रेय गुप्तसम्राटांना देतात; गुप्तसम्राटांचा उदय चौथ्या शतकाच्या मध्याच्या सुमारास झाला. सातवाहनानंतर म्हणजे इ. स. २२५ नंतर पुढच्या १५० वर्षांच्या काळात भारतात सर्व परकी जमातींचे राज्य होते असा समज पंडितांत प्रचलित होता. 'नाग - वाकाटकांच्या साम्राज्याचा काल' या आपल्या ग्रंथात डॉ. जयस्वाल यांनी या मताचे खंडन करून या दोन घराण्यांना भारतीय संस्कृतीच्या संरक्षणाचे व पुनरुज्जीवनाचे श्रेय दिले आहे. म. म. मिराशी यांना डॉ. जयस्वालांची पुष्कळ मते मान्य नाहीत. पण नाग- वाकाटकांचे हे कार्य त्यांना मान्य आहे.
 प्रवरसेनाला चार पुत्र होते. त्यांच्यामध्ये वाकाटकांच्या विस्तीर्ण साम्राज्याची प्रवरसेनानंतर वाटणी झाली असे मिराशी म्हणतात. ज्येष्ठ पुत्र गौतमीपुत्र हा पित्याच्या आधीच मृत्यू पावला होता. त्याचा मुलगा रुद्रसेन हा विदर्भातील नंदिवर्धन या शाखेचा मुख्य झाला. प्रवरसेनाचा दुसरा मुलगा सर्वसेन याने वाशीम ( वत्सगुल्म ) ही आपली राजधानी केली. दुसऱ्या दोन मुलांविषयी कसलीच माहिती उपलब्ध नाही.

गुप्त व वाकाटक
 प्रवरसेनाचा नातू रुद्रसेन ( इ. स. ३३५ ते ३६० ) हा भवनागाचा दौहित्र- मुलीचा मुलगा होता. भारशिव नाग हे कट्टे शिवोपासक होते. रुद्रसेन हा शंकराने दक्षयज्ञ-विध्वंसासाठी निर्माण केलेल्या महाभैरवाचा भक्त होता. चांदा जिल्ह्यात देवटेक गावी 'प्राण्यांची हिंसा कोणी करू नये' अशी आज्ञा असलेला अशोकाचा एक शिलालेख होता. रुद्रसेनाने हा लेख छिलून टाकून त्या शिळेवर आपला लेख कोरविला. अशोकाचा अहिंसाधर्म त्याला मान्य नव्हता हेच त्याचे कारण असले पाहिजे. या रुद्रसेनाच्या कारकीर्दीतच गुप्तवंशातील प्रसिद्ध सम्राट समुद्रगुप्त याचा साम्राज्य- स्थापनेचा महा उद्योग सुरू झाला. त्यामुळे वाकाटकांचे साम्राज्य खूपच संकोच पावले.