Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/११८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
९१
महाराष्ट्रीय राजघराणी
 

घराणे म्हणजे यादवांचीच एक शाखा होती. पण त्यांनी आपली कर्मभूमी कर्नाटक ही मानली आणि भिल्लम यादवाच्या वंशजांनी महाराष्ट्राला स्वराज्य मानले. यामुळे एकवंशीय असूनही ते कर्नाटकी झाले व हे मराठी झाले. होयसळ यादव वीर बल्लाळ व देवगिरी यादव भिल्लम यांचा उदय साधारण एकाच वेळी झाला. दोघेही एकवंशीय पण दोघांमध्ये अखंड संग्राम चालू होते. त्यात महाराष्ट्रात भिल्लमाची सत्ता दृढ झाली. आणि कर्नाटकातील द्वारसमुद्र येथे वीर बल्लाळाची झाली. आणि त्यामुळे त्यांचे राष्ट्रीयत्व अगदी भिन्न होऊन गेले.

सहा राजधान्या
 या राजघराण्यांचा स्वरूपनिश्चय करताना त्यांच्या राजधान्या कोठे होत्या या विचारालाही महत्त्व आहे. म्हणून त्या दृष्टीने विवेचन करून ही चर्चा संपवू. सात- वाहनांपासून यादवांपर्यंतच्या सहा राजघराण्यांपैकी सातवाहन यांची पैठण, वाकाटकांची नंदिवर्धन व यादवांची देवगिरी अशा तीन राजधान्या महाराष्ट्रातच होत्या. राष्ट्रकूटांची राजधानी प्रथम वेरूळच्या आसपास होती; राज्यस्थापनेनंतर सुमारे पाऊणशे वर्षांनी अमोघवर्ष पहिला याने ती मान्यखेटला नेली. हे मान्यखेट आज कानडी मुलखात असले तरी त्या वेळी मराठी भाषिक होते हे अनेक पुराव्यांवरून आता सिद्ध झाले आहे. पुष्पदंत हा अपभ्रंश महाकवी. तो राष्ट्रकूट राजा कृष्ण तिसरा याचा प्रधान भरत याच्या आश्रयाला होता. हा भरत 'प्राकृतकविकाव्यरसावलुब्ध' असा होता. पुष्पदंताचे काव्य जे महापुराण त्याची भाषा जवळजवळ मराठीच आहे, हे श्री. ग. वा. तगारे यांनी सप्रमाण दाखवून दिले आहे ( सह्याद्री, एप्रिल १९४१ ) जसहर चरिऊ, णायकुमार चरिऊ हे आपले इतर ग्रंथ पुष्पदंताने मान्यखेटलाच लिहिले. राष्ट्रकुट राजे संस्कृत व कानडीप्रमाणेच महाराष्ट्री अपभ्रंशालाही उत्तेजन देत असत. पुष्पदंतासारखे कवी महाराष्ट्री अपभ्रंशात रचना करीत, कारण ती त्या वेळी लोक- भाषा - देसी भास होती हे मागे सांगितलेच आहे. तेव्हा मान्यखेट नगरी त्या काळी महाराष्ट्रातच होती असे म्हणणेच सयुक्तिक ठरेल. मान्यखेटचे आजचे नाव मालखेड असे आहे हेही आपण ध्यानी घ्यावे.
 कल्याणीचे चालुक्य यांची मान्यखेट हीच प्रारंभी राजधानी होती. बऱ्याच काळानंतर त्यांनी ती पूर्वेस कल्याणीला नेली. ही नगरी जुन्या निजामी राज्यातील कलबुर्गा शहराजवळ होती. आज ते एक तालुक्याचे लहानसे गाव आहे. त्या गावची आजची भाषासुद्धा मराठी आहे. आज ते गाव कर्नाटक व महाराष्ट्र यांच्या सीमेवर आहे. तेव्हा त्या मागल्या काळी ते महाराष्ट्रात असणे पूर्ण शक्य आहे.
 राहता राहिली एक राजधानी. ती म्हणजे बदामी ह्युएनत्संगाने ज्याला मराठ्यांचा राजा असे म्हटले त्या सत्याश्रय पुलकेशीची ही राजधानी. त्याची दुसरी राजधानी नाशिक किंवा वेरूळ ही असावी असे संशोधकांचे मत असल्याचे वर सांगितलेच आहे.