Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१०१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
७४
 

 ११८९ साली देवगिरीचे यादव सत्तारूढ झाले. हे सम्राटही पराक्रमी होते. दक्षिणेस कावेरीपर्यंत यांनी आपले साम्राज्य विस्तारिले होते, आणि उत्तरेस लाट (गुजराथ), माळवा या प्रदेशांवरही काही काळ आपले अधिराज्य प्रस्थापिले होते. पण हळूहळू या घराण्याचेच नव्हे, तर एकंदर महाराष्ट्राचेच ( आणि भारताचेही ) कर्तृत्व लयास जात होते. विनाशाची, विघटनेची, अधःपाताची बीजे पूर्वीच या जमिनीत पडली होती. ती रूढ होऊन त्यांना आता धुमारे फुटले होते. याची कारणमीमांसा पुढे येणारच आहे. येथे वाकाटकांपासून यादवांपर्यंतच्या महाराष्ट्रातील राज्यकर्त्या घराण्यांच्या कारकीर्दीची रूपरेखा फक्त दिली आहे. एका दृष्टिक्षेपात या हजार वर्षांच्या काळातील महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाचे चित्र आकळता यावे आणि पुढील विवेचन समजण्यास सुलभ व्हावे हा यातील हेतू. येथे एवढेच सांगावयाचे की यादवांच्या अखेरच्या काळात त्यांची सत्ता व दक्षिणच्या सर्व राजसत्ता अवघ्या दहापंधरा वर्षांच्या अवधीत मुस्लिम आक्रमणाला बळी पडल्या, हा केवळ योगायोग नाही. धर्म, समाजरचना, राजनीती, यांना इतके विपरीत रूप या काळात प्राप्त झाले होते की हा विनाश अटळ होता. पण तो पुढचा भाग आहे. एक हजार वर्षे महाराष्ट्राचे स्वातंत्र्य ज्यांनी अबाधित राखले व त्याच्या संस्कृतीला मोठे वैभव प्राप्त करून दिले त्या राजघराण्यांच्या कर्तृत्वाचे प्रथम आपल्याला अवलोकन करावयाचे आहे. प्रत्येक घराण्यात थोर कर्ते राजपुरुष कोण झाले, त्यांनी कोणता विशेष पराक्रम केला, त्यांचे स्वराज्य व साम्राज्य किती विस्तृत होते, शास्ते म्हणून त्यांची योग्यता काय होती, हे सर्व जरा तपशिलाने आपणास पहावयाचे आहे. पण त्याआधी ही सर्व घराणी महाराष्ट्रीय होती की नाही याचा निश्रय आपल्याला केला पाहिजे. सातवाहन घराण्याचा याच दृष्टीने गेल्या प्रकरणात आपण विचार केला. तसाच आता वाकाटक, बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट, कल्याणीचे चालुक्य व यादव या घराण्यांचा करावयाचा आहे. या दीड हजार वर्षांच्या काळात, महाराष्ट्राला स्वतंत्र अस्मिता होती, त्याचे स्वातंत्र्य अबाधित होते, त्याचे राजकीय कर्तृत्व असामान्य होते, ही सर्व विधाने, ही घराणी महाराष्ट्रीय होती असे सिद्ध झाले तरच सार्थ होतील. म्हणून प्रथम त्याची चर्चा करावयाची आहे. ती करताना ही घराणी डोळ्यांपुढे असणे अवश्य, म्हणून त्यांच्या इतिहासाची अगदी स्थूल रूपरेखा वर दिली आहे. त्यांच्या महाराष्ट्रीयत्वाचा निश्चय या प्रकरणात झाला म्हणजे मग पुढील प्रकरणात या पाचही घराण्यांचे राजकीय कर्तृत्व थोड्या तपशिलाने पाहू.

महाराष्ट्रीयत्वाचा निकष
 त्यांच्या महाराष्ट्रीयत्वाचा निश्चय करताना हे राजवंश मुळात कोठून आले, त्यांचे अगदी प्राचीन पूर्वज कोणत्या वर्णाचे होते ही चिकित्सा पंडित करतात. ऐतिहासिक जिज्ञासेच्या दृष्टीने व इतिहासलेखनाच्या परिपूर्तीसाठी हा शोध करणे अवश्य आहे.