Jump to content

पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 कुटुंब नसलेल्यांची कुटुंब


 समाजात दोन प्रकारची माणसं राहतात- १) कुटुंब असलेली २) कुटुंब नसलेली. कुटुंब असलेली माणसं स्थूल अर्थाने ज्याला आपण 'घर' म्हणतो तिथं राहतात. ती जन्मसंबंधांनी एकमेकांशी जोडलेली असतात. ती रक्तसंबंधावर आधारित असतात. त्यात नाती असतात. आजी-आजोबा, आई-वडील, भाऊबहीण इ. यांचे वर्ग, जात, धर्म, वंश, परंपरागत संबंध विकसित होत असतात.
 यापेक्षा वेगळी माणसं पण समाजात राहात असतात. हे वेगळेपण समाजानं त्याच्या विवाह, जन्म, जात, धर्म, वंश, स्वरूप संबंधी नैतिकता, परंपरा, रूढी, संबंध, नाती इ. दृष्टिकोनातून निर्माण केलेलं असतं. उदा. अनाथ, अनौरस, निराधार, बलात्कारित, कुमारी माता, वेश्या, कुष्ठरोगी, देवदासी आणि त्यांची अपत्ये, धरणग्रस्त, युद्धग्रस्त कुटुंब बंदीबांधव (कैदी), वृद्ध, अपंग, मतिमंद, घटस्फोटित, परित्यक्ता, एड्सग्रस्त, तृतीयपंथीय, दत्तक अपत्ये व त्यांची कुटुंबं...किती प्रकार सांगू? यांना रुढ अर्थाने आई, वडील, कुटुंब, घर सारं असतं, पण समाज हा परंपरामान्य संबंधांवर उभा असल्यानं समाजअमान्यांना नाकारलं जातं. मग ती मुलं, महिला, माणसं... माणसं असूनही संस्थांत राहण्याची नामुष्की समाज त्यांच्या माथी मारतो. मग संस्था हेच त्यांचं घर, कुटुंब, नातं होतं व तिथे ते राहतात. असं कुटुंब नसलेल्यांचं एक कुटुंब... वंचितांचं कुटुंब तयार होतं. हेही अनेक प्रकारचं असतं. म्हणजे समाजातील अन्य घरांसारखं स्त्री, पुरुष, मुलं असलेलं. नुसतं मुलांचं. कधी नुसतं मुलींचं. कधी नुसतं प्रौढांचं. कधी वृद्ध आजी-आजोबांचं तर कधी चक्क एक दिवसाच्या बाळापासून ते १०० वर्षांच्या आजी-आजोबांचं पण.

 ही कुटुंबं म्हणजे समाजानं नाकारलेल्या, उपेक्षिलेल्यांच्या संस्था होत. अर्भकालय, अनाथाश्रम, महिलाश्रम, रिमांड होम, वृद्धाश्रम, तुरुंग, आधारगृह,

महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा...१४३