पान:महाराजा सयाजीराव आणि शेतीविकास.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्याज या बाबींचा अभ्यास केला. या आयोगाची सूचना लक्षात घेऊन कर्जबाजारी व उच्च व्याजदराने शोषित शेतकरी जनतेला दिलासा देण्यासाठी सयाजीरावांनी कृषी बँकांची स्थापना केली. संस्थानात उद्योग उभा करण्याआधी उद्योगाला कच्चामाल पुरवणाऱ्या कृषी क्षेत्राला आर्थिक आधार पुरवण्याची दूरदृष्टी यामागे होती. आजच्या भारतीय कृषी क्षेत्राच्या स्थितीचे अवलोकन केले असता सयाजीरावांच्या या 'दृष्टी'ची आज आपल्याला सर्वाधिक गरज असल्याचे स्पष्टपणे जाणवते.
 सयाजीरावांनी १९१३ मध्ये व्यापार, उद्योग व कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सल्ला देण्यासाठी नेमलेल्या सल्लागार समितीमध्ये एकूण २२ सदस्य होते. बडोद्यात उद्भवणाऱ्या व्यापार, उद्योग व कृषी क्षेत्रासंबंधित सर्व आर्थिक समस्यांचा अभ्यास करून त्यांच्या सोडवणुकीसाठी बडोदा सरकारला सल्ला देणे हे या सल्लागार समितीचे मुख्य कार्य होते. १९१४ मध्ये बडोद्यात स्थापन झालेला 'श्री सयाजी आयर्न वर्क्स' हा कारखाना कृषी अवजाराच्या निर्मितीत अग्रेसर होता. या कारखान्यात विविध प्रकारची कृषी उपकरणे, लोखंडी पाईप, पाईपलाईनसाठी वापरले जाणारे व्हॉल्व्ह, रस्ते बांधण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रे, वस्त्रोद्योगांसाठी लागणारे ब्लिचिंग यंत्रे इ. ची निर्मिती करण्यात येत असे.

महाराजा सयाजीराव आणि शेती विकास / ४०