पान:महाराजा सयाजीराव आणि शेतीविकास.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लावणाऱ्या सयाजीरावांची दूरदृष्टी २१ व्या शतकात जगणाऱ्या आपल्यासारख्या सुजाण नागरिकांनी 'समजून घेणे आवश्यक आहे.

 दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात सयाजीरावांनी शेतकऱ्यांना खंबीर आधार दिला. १८९९ मध्ये दुष्काळाच्या काळात शेतसारा वसुलीसाठी कोणत्याही कठोर उपाययोजना करण्यास प्रतिबंध घालणारा हुकूम सयाजीरावांनी काढला. या काळात शेतकऱ्यांवर कोणताही दबाव न आणता उत्पन्नाची साधने उपलब्ध असणाऱ्या व जमिनीत थेट गुंतवणूक असणाऱ्या लोकानांच शेतसारा भरण्यासाठी बोलावण्याची सूचना महाराजांनी आपल्या अधिकाऱ्यांना केली होती. शेतसारा भरण्यास असमर्थ असणाऱ्या व्यक्तींना शक्यतोवर कोणत्याही प्रकारची सक्ती न करण्याचा धोरणात्मक निर्णय सयाजीरावांनी घेतला. रब्बी हंगामाच्या सुरुवातीला बी-बियाणे आणि शेतीसाठी उपयुक्त वस्तूंच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना सरकारच्या वतीने तगाई देण्यासाठी महाराजांनी ५०,००० रु.ची विशेष तरतूद केली. दुष्काळाच्या काळात सयाजीरावांनी आपल्या संस्थानातील 'बळीराजा'ची घेतलेली काळजी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'जाणतेपणा'ची आठवण करून देते.

 ५ फेब्रुवारी १९१९ रोजी अमरेली येथील कृषी औद्योगिक प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केलेल्या भाषणात कृषी खात्याच्या कामाचे कौतुक करताना सयाजीराव म्हणतात, “रा. शितोळे

महाराजा सयाजीराव आणि शेती विकास / २२