पान:महाराजा सयाजीराव आणि शेतीविकास.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होते. संस्थानाचा मंत्री हा या बोर्डाचा पदसिद्ध अध्यक्ष होता तर संस्थानाचा विकास आयुक्त या बोर्डाचा सचिव होता.
III) जिल्हा समिती
 ट्रस्ट बोर्ड जिल्हा बोर्डाच्या सल्ल्याने काम करत असे. जिल्हा समिती प्रत्येक प्रांताअंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यात जिल्हा समिती स्थापन करण्यात आली होती. संस्थान आणि प्रांतपंचायत यांच्या उपक्रमांशी कोणताही विसंवाद न होता राबवता येतील असे उपक्रम तयार करण्याची जबाबदारी जिल्हा समितीवर होती. सध्या महाराष्ट्रात प्रचलित असणाऱ्या जिल्हा नियोजन समिती सारखी या समितीची रचना होती.
IV) निधी वितरणाचे सर्वसाधारण सूत्र
या फंडाचे उद्दिष्ट साध्य होण्यासाठी दीर्घकालीन कार्यक्रम आणि निधी वितरणाची व्यवस्था आवश्यक होती. या संदर्भात २३ ऑगस्ट १९३७ रोजी ट्रस्ट बोर्डाच्या मीटिंगमध्ये या फंडाच्या सर्वसाधारण धोरणाची निश्चिती झाली.
V) जिल्हा कार्यक्रम
 जिल्हा समित्यांना गावाच्या गरजांचा विचार करून दशवार्षिक विकास कार्यक्रम तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रत्येक गावात जाऊन गावकरी आणि ग्रामपंचायत यांच्याबरोबर बैठका घेऊन योजनांना गती देण्यासाठी विशेष अधिकारी नेमण्यात आला. लोकांच्या इच्छा आकांक्षा जाणून

महाराजा सयाजीराव आणि शेती विकास / १४