पान:महाराजा सयाजीराव आणि शेतीविकास.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मध्ये कलकत्ता येथे जनतेच्या वतीने देण्यात आलेले मानपत्र स्वीकारताना केलेल्या भाषणात सयाजीरावांनी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी शेतकऱ्यांना शेती आणि उद्योगाचे आंतरशाखीय शिक्षण देण्याची आवश्यकता विशद केली आहे. या भाषणात सयाजीराव म्हणतात, “सध्यापेक्षा चांगली अवजारे तयार करणे व ती चांगल्या रीतीने वापरणे या गोष्टी शेतकरीवर्गाला करता आल्याखेरीज त्या वर्गाची शेतीसंबंधाने सध्या जी हीन कल्पना आहे ती बदलणे शक्य नाही, याच कारणास्तव शेतकीचे शिक्षण व औद्योगिक शिक्षण यांची सांगड घालणे आवश्यक आहे." या भूमिकेला अनुसरूनच सयाजीरावांनी पुढे संस्थानातील काही विद्यार्थ्यांना इंग्लंडच्या सिरेनस्टर येथील 'रॉयल कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर' मध्ये शेतीविषयक प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवले. प्रशिक्षण पूर्ण करून परतताच या विद्यार्थ्यांना सयाजीरावांनी कृषी विभागातील कामाची जबाबदारी दिली. शेती क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याचा हा भारतातील पहिला प्रयत्न होता.
शेतीविषयक ज्ञानाचे सार्वत्रिकीकरण
 कृषी क्षेत्राच्या विकासासाठी तरुणांना अत्याधुनिक उच्च शिक्षण देत असतानाच या 'ज्ञानाचे सार्वत्रिकीकरण' करण्यावर सयाजीरावांनी जाणीवपूर्वक भर दिला. सयाजीरावांनी वैज्ञानिक विषयावरील मराठी ग्रंथ निर्मितीसाठी केलेल्या ‘सयाजीज्ञानमंजूषा' या ग्रंथमालेत 'कृषीकर्मविद्या' हा ६००

महाराजा सयाजीराव आणि शेती विकास / १०