Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 मार्च १९३० मध्ये प्रतापसिंह सरोवराच्या उद्घाटनप्रसंगी केलेल्या भाषणात सयाजीरावांनी बडोद्यातील विविध वस्तू निर्मितीमागील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महाराज म्हणतात, “गेल्या पन्नास वर्षांत या राज्यातील बांधकामांत जे धोरण राखण्यात आले आहे, त्यात मी मुख्यत: दोन तत्वे आपल्या नजरेसमोर ठेवली होती. ज्या ज्या वेळी एखाद्या नव्या संस्थेला जागेची गरज पडते, त्या त्या वेळी ती गरज पुरी करण्याचे दोन मार्ग असू शकतात. एक मार्ग हा की, केवळ व्यावहारिक उपयोगीताकडे लक्ष देऊन संस्थेसाठी बराकीप्रमाणे अथवा वखारीप्रमाणे, वरती छपरे व बाजूंना भिंती असलेल्या खोल्या बांधून आपल्याला गरज भागविता येईल; परंतु या मार्गाचा अवलंब मोठमोठी शहरे बांधणारांनी कधीही केलेला नाही. यासाठी अशा प्रसंगी उपयुक्तता व सौंदर्य या दोन दृष्टींचा मिलाफ करून त्या संस्थेला जागेची असलेली गरज पुरविण्याबरोबरच त्या कामासाठी बांधली जाणारी इमारत ही शहराला भूषणरुप व्हावी, असे धोरण मी नेहेमी ठेवले आहे. प्राचीन काळच्या रोम शहरांचे वैभव तत्कालीन प्रचंड इमारतींवरून समजून येते व मध्ययुगीन रोमचे ऐश्वर्य सेंट पीटर्सच्या प्रचंड मंदिराच्या रुपाने दृग्गोचर होते. पॅरिस शहराचा आत्मा आपल्याशी त्या शहरातील भव्य इमारतींच्या रुपाने प्रत्यक्ष बोलत असल्याचा भास होतो. घाणेरड्या गावांतून घाणेरड्या लोकांचीच पैदास होते.

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / ८