पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Lukshmi Vilas Palace (Rajmahal/LVP)
 लक्ष्मीविलास राजवाड्याचे बांधकाम १२ जानेवारी १८८० (वार सोमवार) दिवशी सुरू झाले. तब्बल १० वर्षांनी म्हणजे इ.स. १८९० ला राजवाड्याचे बांधकाम पूर्ण झाले. त्यावेळी पॅलेसच्या बांधकामाचा खर्च ५० लाख रुपये आला होता आणि एकोणीसाव्या शतकातली एवढी किमती इमारत दुसरी कोणतीही नसावी. राजवाड्याचा एकूण परिसर ७४४ एकराचा असून पश्चिमेकडील व दक्षिणेकडच्या बाजूच्या शेवटी रेल्वेचे फाटे आहेत. या राजवाड्याचे भव्य कलाकुसरीने सज्ज असलेले प्रवेशद्वार पुर्वेकडे आहे. या प्रवेशद्वारावर सुंदर कोरीव काम केलेले आहे. मुख्य दरबाराच्या प्रवेशद्वाराच्या पायथ्यापासून ४-५ फूट उंचीवर हत्तींचे पॅनल आहे. त्याला लागूनच दोन्ही बाजूला चौकीदारांसाठी चौक्या आहेत. या चौक्यांवर सुध्दा सुंदर नक्षीकाम असून त्यांना डेरेदार देखणे घुमट आहे.

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / १६