Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महात्मा फुलेंच्या मागणीच्या पुढे जाऊन सयाजीरावांनी वधू-वर पक्षाबरोबर बालविवाह लावणाऱ्या भटजीलासुद्धा दंड आणि शिक्षेची तरतूद या कायद्यात केली.
 हिंदू कोड बिल हे स्वातंत्र्योत्तर भारतात भारतीय महिलांच्या उत्कर्षाचा महत्त्वपूर्ण मार्ग मानले गेले. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी संघर्षरत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अखेरीस आपल्या कायदेमंत्रिपदाचा राजीनामा दिला हे आपण जाणतोच. परंतु भारतीय राज्यघटनेत या विषयाची चर्चा सुरू होण्याअगोदर ४५ वर्षे बडोद्यात हिंदू कोड बिलाची अंमलबजावणी सुरू झाली होती. हिंदू कोड बिलातील सर्व ६ कायदे सयाजीरावांनी १९०५ ते १९३३ दरम्यान बडोद्यात लागू केले. उर्वरित भारतातील हिंदू महिलांना जे हक्क मिळायला ६०-७० वर्षे संघर्ष करावा लागला ते हक्क बडोद्यातील स्त्रियांना उर्वरित भारतातील हिंदू स्त्रियांच्या अगोदर ११५ वर्षे मिळाले होते.

 १९०५ मध्ये बडोद्यात हिंदू विवाह कायदा लागू करण्यात आला. या कायद्यात हिंदू लग्नाच्या मूलतत्त्वाची व्याख्या करून, कायदेशीर लग्नाच्या अवश्य गोष्टी, स्त्री-पुरुषांचे परस्पर हक्क, त्यांचे मिळकतीवरील अधिकार, एकमेकांबद्दलची जबाबदारी व लग्न संबंधाची अविछीन्नता या सर्व गोष्टी निश्चित करण्यात आल्या. हिंदू विवाह कायदा करणारे बडोदा हे ब्रिटिश भारत आणि ५६५ संस्थानातील पहिले संस्थान होते.

महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह / १८