Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कार्याबाबत जागरूक व सजग नागरिक तयार करण्याच्या उद्देशाने सयाजीरावांनी दिलेल्या १६ एप्रिल १९३५ च्या आदेशानुसार बडोद्यात गर्ल्स गाईडची चळवळ सुरू केली. बडोद्याच्या फिमेल ट्रेनिंग कॉलेजमध्ये गर्ल्स गाईडची संकल्पना सर्वप्रथम राबवण्यात आली.
 जेव्हा पुरुषांना शिक्षणासाठी परदेशात पाठवण्याची बाब दुर्मिळ होती तेव्हा सयाजीरावांनी महिलांना शिक्षण घेण्यासाठी परदेशात पाठविले. सयाजीरावांनी मिस राधाबाई पोवार यांना अध्यापनशास्त्राचे शिक्षण घेण्यासाठी १९१४-१५ मध्ये अमेरिकेच्या टीचर्स कॉलेजमध्ये पाठविले व दोन वर्षासाठी वार्षिक १५० रु. वेतन दिले. १९१७-१८ मध्ये स्नेहलता पगार यांना बालसंगोपनशास्त्रातील उच्च शिक्षणासाठी सरकारी खर्चाने अमेरिकेला पाठविण्यात आले. टी. सी. गजदार यांना 'बालवाडी व बालमानसशास्त्र' या विषयाच्या उच्च शिक्षणासाठी लंडनला पाठविले. भारताच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या हंसा मेहता यांनाही उच्च शिक्षणासाठी सयाजीरावांनी आर्थिक मदत केली होती.
महाराणी चिमणाबाई : स्त्री कर्तृत्त्वाचा 'परमोच्च' विकास
 स्त्रीशिक्षणाच्या दिशेने वाटचाल करताना सयाजीरावांनी महाराणी चिमणाबाईंपासून सुरुवात केली. विवाहापर्यंत निरक्षर असणाऱ्या चिमणाबाईंना शिक्षण देऊन सयाजीरावांनी त्यांच्यातील परिपूर्ण स्त्री घडवली. महाराजांच्या ' वाटेने '

महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह / १०