Jump to content

पान:मनतरंग.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणि अग्नीकन्या ही किती व्यक्तिसंपन्नत्व देणारी, पण आज ?...
 प्रथमावस्थेत कृषिजीवनात स्त्रीच्या विविध रूपांना सन्मान होता. कुटुंबात त्या अधिकारिणी होत्या. ब्रह्मवादिनी होण्याची त्यांना संधी होती. कृषिनिर्भर व्यवसायात त्यांचा उत्पादक म्हणून सहभाग होता. शेतीची, विणकामाची कला त्यांनी शोधली व विकसित केली. पण, मानवी विकासाच्या एका टप्प्यावर त्यांचे समाजातील व कुटुंबातील स्थान दुय्यम होत गेले. 'मनस्वी' असलेले स्थान 'देहस्वी' होत गेले. भर सभेत वस्त्र फेडण्याचा वस्तुपाठ, गुरुजनांच्या आणि ज्येष्ठांच्या साक्षीने गिरवला गेला. मग 'अवगुंठन' पांघरून स्वत:ला 'अदृश्य' करून घेण्यापलीकडे तिच्या हाती काय उरले होते ?
 बाईने अध्ययन करू नये, प्रश्न विचारू नयेत, वाट्याला येईल ते जिणे न कुरकुरता, परमेश्वराची इच्छा म्हणून जगावे, असे संकेत निर्माण झाले. आणि वर्षानुवर्षे हे संकेत आमच्या मनात एवढे घट्ट रुतले आहेत, इतके खोलवर रूजले आहेत की जणू 'एडस्' चे विषाणू. त्यातूनच रिंकू पाटील, अमृता देशपांडे, रूपाली पाटीलसारख्या घटना अवतीभवती घडत असतात.
 उद्याचे नवनवोन्मेषी भविष्य जिच्या उदरात फलित होणार आहे, वाढणार आहे, ती कुमारिका समाजाच्या दृष्टीने कोण आहे आज? मालकी हक्क मिळविण्याची एक वस्तू ? एक शरीर ? तिचा मालकी हक्क एका पुरुषाकडे. तिने आपल्या स्वतंत्र मनस्वी रूपाची झलक जरी दाखवली तरी तिला संपवण्याची भाषा बोलली जाते, कृती केली जाते. आज तर ती 'परंपरा' होऊ लागली आहे. साथ मिळते ती 'डर' सारख्या चित्रपटांची. जाहिरातींची माध्यमे शेवटी ही आमच्या मनाचा आरसाच.
 आजही नवरात्रात कुमारिकांची पूजा केली जाते. केवळ साग्रसंगीत पूजा करण्यापेक्षा, त्यांच्यातील तेजस्विता, ऋजुता, प्रगल्भता वाढविण्याच्या दृष्टीने काही परंपरा निर्माण करण्याची खरी गरज आहे. कारण त्या उद्याच्या समृद्धीचा आदिबिंदू आहेत. त्या समृद्ध आणि निर्भय जीवन जगतील तरच पुढची पिढी उन्मेषाने पुढे झेपावेल. झाड निरोगी, सुदृढ, बहरलेले तर फळेही तेजस्वी आणि मधुर मिळणार. बाबा आमटे म्हणाले होते,
 ...आपल्या बाळाच्या हातात आईच जेव्हा स्टेनगन देते तेव्हा टेरेरिस्ट निर्माण होणार नाही तर कोण ?

■ ■ ■

मनतरंग / ६४