Jump to content

पान:मनतरंग.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 'मी प्रथम ख्रिश्चन आहे आणि मग इंडियन.. भारतीय आहे.'
 त्याचे बोलणे आम्हाला धक्का देणारे, न पटणारे होते. आमच्या मनातली अस्वस्थता त्याने ओळखली आणि तो सांगू लागला,
 "मॅडम, माझे पणजोबा माणसं खाणारे होते. देवासमोर माणूस बळी द्यायचा नि तो भाजून मिटक्या मारीत खायचा, ही हजारो वर्षांपासूनची आमची परंपरा, आम्ही शरीराने माणूस. काळाच्या प्रवाहात माकडाचे असलेले शरीर माणसासारखे झाले एवढेच. पण आमचे मन ? आमचा व्यवहार ? आम्हांला जगण्याची दिशा दाखवताना शेकडो मिशनरींनी, धर्मगुरूंनी प्राण गमावले. 'करुणा आणि प्रेम' या दोन रेशमी हत्यारांच्या साहाय्याने आमच्यासारख्या लाखोंना माणसात आणले. कपडे घालायला, अन्न शिजवायला, झोपडी बांधायला, शेती करायला शिकवले. भाषेचा वापर शिकवला. आम्ही घनदाट जंगलात राहणारी, रानटी प्राण्यांशी आणि कोपलेल्या निसर्गाशी संघर्ष करीत जगणारी माणसं, ज्यांनी आमचे जगणे माणसांचे केले, त्यांनी शिकवलेला धर्म आमच्या मागच्या पिढ्यांनी सहजपणे स्वीकारला. किंबहुना तोच एकमेव धर्म आमच्या मनात रुजला. आमच्यासारखी एकदोन मुलं भारतातल्या शहरांत शिकण्यासाठी येतात. त्यामुळे देशातल्या मिशनऱ्यांबद्दलचे ऋण अधिक बळकट होत जाते.'
 तो नागा मुलगा डॉक्टर झाला आणि नोकरीच्या मागे न लागता परत आपल्या परिसरातील लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यायला गेला, त्याची पुढची पिढी तरी, 'मी भारतीय आहे आणि मग ख्रिश्चन आहे' असे सांगणारी असेल का ?
 आठ मार्चच्या निमित्ताने गोव्याला मला निमंत्रण होते. गोव्याचे समुद्री सौंदर्य पाहण्याचीही इच्छा होती. व्याख्यानांच्या निमित्ताने अत्यंत देखणी देवळे पाहता आली.
 घरासमोरच्या देवळीत सायंकाळी दिवा तेवताना पाहिला. खूप प्रसन्न वाटले. जवळ गेले तर त्या देवळीत चिमुकला क्रूस आणि समोर तेवणारी मेणबत्ती. माणसं कुठलीही असोत, कोणत्याही धर्माची असोत, तमसो मा ज्योतिर्गमय... अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा ध्यास-हीच त्यांची दिशा. शांतादुर्गेच्या देवळात गेलो तर एक नाचता झुलता स्त्रीपुरुषांचा जत्था देवीसाठी फुलांनी विणलेली छत्री वाहण्यासाठी येत होता. चौकशी केल्यावर कळले गावातले ख्रिश्चन दरवर्षी

प्रकाशाच्या दिशेने / ९३