Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/८७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करतात. तामिळनाडूत कोलवू हा उत्सव नववधू आणि कुमारिकांचा. धातूच्या वा मातीच्या बाहुल्यांची आरास मांडून मध्यभागी कलश ठेवून त्यावर सरस्वतीची स्थापना करतात. सरस्वती ही कुमारिकेचे प्रतीक आहे. हा उत्सव नवरात्रातील नऊ दिवस असतो. हा उत्सव आंध्रातही होतो. बंगालमध्येही नवरात्रात कुमारीपूजा केली जाते. उत्तर प्रदेशात नऊ दिवस कुमारिकांनी..... ज्यांना कंचिकांअे म्हणतात, त्यांची आणि एका लौंगड्याची.... लौंगडा म्हणजे कुमार, यांची पूजा करतात. अष्टमीला मोठी पूजा असते. जेवणात चण्याची उसळ, हलवा आणि पुरी असा प्रसाद असतो. तो नऊ दिवस करतात. शेवटच्या दिवशी कुमारिकांना कपडे करतात. किमान चुन्नी.... ओढणी तरी दिलीच जाते. ज्या परिसरात भातशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते किंवा जेथे आघाताचे (आषाढाचे....) म्हणजेच खरिपाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते तेथे सर्जन आणि वर्षन शक्तीची पूजा होते.
 वृक्षपूजा : भारतीय जीवन पद्धतीचे वैशिष्ट्य -
 झाडांची पूजा करण्याची प्रथा प्राचीन काळापासून भारतात आहे. हादगा हे झाड कोकणात फार उपयोगाचे मानले जाते. पाऊस काळात त्याला बहर येतो. या फुलांची भाजी व पिठात फुले घालून भाकरीही करतात. कोवळ्या शेंगाची भाजीही करतात. झाडाच्या उपयुक्ततेतून त्याची पूजा केली जात असावी असे दुर्गाताई भागवताना वाटते. भारतीय जीवनपद्धतीत वड, पिंपळ, आवळी, तुळस आदींची पूजा होते. छत्तीसगढ भागातील कर्मानृत्य,ज्याला करमराही म्हणतात, झाडाभोवती फेर धरून केले जाते. आदिमानवाने निसर्गाशी आपेल नाते जीवन जगण्याच्या रीतीतून जडवले होते. देणारा आणि घेणारा तो. त्यामुळे निसर्गाच्या लीलांबद्दल कुतुहल होते तसेच भयही होते. या जाणीवेतून निसर्गाचे रक्षण करण्याची त्यांच्या लीलांचा सत्कार करण्याची, निसर्गसंकेतांना जपण्याची परंपरा मानवाने निर्माण केली. त्याचे दर्शन सण, उत्सव, व्रते, तत्संबंधी गीतांतून होते.
 भुलाबाई -
  भाद्रपदाचा महिना आला
  आम्हा मुलींना आनंद झाला
  पार्वती बोले शंकराला

८२
भूमी आणि स्त्री