Jump to content

पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६२
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

कितपत पुण्यप्रद होईल; रशिया, इजिप्त यांच्या मैत्रीवर किती प्रमाणात विश्वास ठेवावा, आपल्या देशात येऊन गोड भाषणे करून जाणाऱ्या परदेशी पाहुण्यांची आश्वासने आपण कितपत मानावी, स्वराष्ट्रापेक्षाही सर्व जगाच्या कल्याणाची चिंता भारताला जास्त आहे, असा गौरव ते करतात त्याने आपण कितपत भुलून जावे; सत्य न्याय, अहिंसा यांचाच अखेरीस जय होतो असा दृढ विश्वास धरून आपण किती निश्चिंत राहावे, असे व या प्रकारचे अत्यंत जटिल व गहन प्रश्न आपल्यापुढे उभे आहेत अत्यंत आश्चर्याची गोष्ट अशी की असल्या राजनैतिक समस्यांची महाभारतात जी चर्चा आहे व तिच्या आधारे तेथे जे सिद्धांत सांगितले आहेत ते वाचीत असताना ती चर्चा आजचे प्रश्न प्रत्यक्ष डोळ्यासमोर ठेवूनच केलेली आहे असे वाटते. शेकडो वर्षे झाली तरी मानवी स्वभाव अणुमात्र बदललेला नाही असे हा भाग वाचताना आपल्या प्रत्ययास येत असते. आणखी एक गोष्ट ध्यानात येते. अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी ही सर्व राष्ट्रे महाभारत डोळ्यासमोर ठेवूनच पदोपदी वागत आहेत; श्रीकृष्ण, भीष्म, नारद यांचेच सिद्धांत त्यांनी शिरोधार्य मानले आहेत याची पदोपदी खात्री पटत असते. मन व्याकुळ करणारी आणखी एक गोष्ट आहे. महाभारतातील राजनीतीच्या या सिद्धांताना हेटाळणारा, त्या थोर व्यवहार-विशारदांच्या मतांना तुच्छ मानणारा, आणि त्या इतिहास पुनीत तत्त्वांची दरक्षणी पायमल्ली करणारा जगात एकच देश आहे. तो कोणता ? महाभारत जेथे जन्माला आले तो आपला भारत !
 आजच्या या सत्य-अहिंसा-पंचशीलांच्या काळात महाभारताचा अभ्यास करण्यास सांगणे हे सुद्धा भारतीयांना अपमानास्पद