Jump to content

पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/129

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणि नैसर्गिक शेती करायला लागा आणि मग गावोगाव नैसर्गिक शेतीचे प्रयोग सुरू झाले. खताच्या ऐवजी गायीचे शेण वापरायचे आणि औषधांच्याऐवजी गायीचे मूत्र वापरायचे. आर्थिक उपलब्धीचा काही हिशोब मांडलाच गेला नाही.
 त्या काळात लिहिलेल्या एका लेखात मी लिहिले आहे की प्रगती ही अशा तऱ्हेने मागे जाऊन होत नाही. जर नैसर्गिक शेतीमुळे प्रचंड पीक येत असते आणि लोकांना भरपूर खायला मिळाले असते तर या देशामध्ये दुष्काळ कधी पडायलाच नको होता. कारण हजारो वर्षांपासून आपली शेती नैसर्गिकच आहे. आतापर्यंत आपण कधी खते आणि औषधे वापरतच नव्हतो. या समस्येवर तोडगा पुढची शास्त्रीय पायरी गाठल्याने मिळेल, मागे गेल्याने नाही. प्रगती कधी मागे गेल्याने होत नाही, पुढे गेल्याने होते.
 मी एका भाषणात एक कल्पना मांडली होती. एखादा रोग होऊ नये म्हणून माणसांना जसे इनॉक्युलेशन करतात तसे झाडांना करता आले तर हा प्रश्न सुटू शकतो. औषध फवारणी करून आपण संपूर्ण झाडांना औषधाची अंघोळ घालतो. त्यातले फारच थोडे औषध रोगनिवारणासाठी आवश्यक असते. उरलेले सारे निसर्गातील प्रदूषणाला कारणीभूत होते. माणसांना जसे इंजेक्शन किंवा सलाईनच्या माध्यमातून आवश्यक तितकेच औषध देण्याची सोय आहे तशी झाडाच्या बाबतीत करता आली तर खर्चही वाचेल आणि पर्यावरणालाही धोका राहणार नाही.
 आता जैविक तंत्रज्ञान विकसित होत आहे. प्रत्येक जीवमात्र सूक्ष्म कणापासून सुरू होतो. या कणामध्ये कॉम्प्युटरच्या प्रोग्रॅमप्रमाणेच एक प्रोग्रॅम असतो आणि त्या प्रोग्रॅमनुसार त्या जीवमात्राची कणाकणाने वाढ होते. जैविक तंत्रज्ञानाच्या परिभाषेत या कणांना जनुक (Gene) म्हणतात. या जनुकाच्या प्रोग्रॅममध्ये प्राण्याच्या डोळ्याचा रंग निळा असणार अशी आणखी असेल तर तो निळाच होणार, नाही तर नाही.

 शास्त्रज्ञांनी जनुकातला हा प्रोग्रॅम पाहिला, कोणत्या जागी कोणता नियम असतो ते पाहिले. सध्या वादग्रस्त ठरलेले कपाशीचे बोलगार्ड बियाणे हे या जनुकांच्या अभ्यासातून निर्माण झाले आहे. शास्त्रज्ञांनी साध्या कापसाच्या बियाण्याच्या जनुकाचा अभ्यास केला त्याचबरोबर बोंडअळीला तोंड देण्याची ताकद असलेल्या वाणाच्याही जनुकाचा अभ्यास केला. जनुकातील ज्या घटकामुळे

बळिचे राज्य येणार आहे / १३१