Jump to content

पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/179

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 “ओ माय गॉड!" थक्क होत विस्मयानं शिरूरे मॅडम उद्गारल्या, “त्या जज्जची अपकीर्ती माझ्या कानावर आहे आणि तुम्ही म्हणता ते खरं मानते मी. आय हॅव नो डाऊट अबाऊट युवर सिन्सिरिटी अँड इंटिग्रिटी. ओ.के., लेटअस टेक कॉशिअस डिसिजन. आपण अपील जरूर करू या."

 तो विशेष भूमी संपादन अधिकारी त्या निर्णयानं चांगलाच अस्वस्थ झाला होता. त्याला काहीतरी बोलायचं होतं. सांगायचं होतं. पण हिंमत होत नव्हती. तरीही धीर गोळा करून, चंद्रकांतच्या कानाशी लागत म्हणाला,

 “सर, मी काही सांगावं असं नाही. पण यात बडे उच्चपदस्थ लोकप्रतिनिधी गुंतलेले आहेत. त्यांचं सारं काही ठरलं आहे. आजच्या मिटिंगमध्ये अपील करायचं नाही असं ठरलं की, तिकडे आठ दिवसात शासनाची कोर्टाच्या नियमाप्रमाणे वाढीव मोबदला अदा करायची परवानगी व निधी मिळणार आहे."

 “ते मला माहीत आहे, पाटील."

 "सर, जिल्हा प्रशासनावर व खास करून माझ्यावर माजी नगराध्यक्ष व आमदाराचा भारी दबाव आहे" पाटील म्हणाले, “तुम्ही स्वत:ची माहिती व ज्ञान उघडं केलं नसतं तर आमच्या शहरातील इतर प्रकरणांचा न्याय लावून यातही अपील करायचं नाही, असा निर्णय झाला असता. मॅडमही तयार होत्या. पण..."

 "पाटील, प्लीज स्टॉप धिस." चंद्रकांतला प्रयत्न करूनही आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवता येत नव्हतं. “आपण इथं शासनाचं हित पाहून निर्णय घ्यायला बसलो आहोत. या अपील न करण्याच्या निर्णयाचा शासनाला किती भुर्दंड बसणार आहे, माहीत आहे ? सुमारे सत्तर लाख रुपये... ते वाचतील आपण अपील केलं तर; आणि हायकोर्टात आपण जिंकू शकतो. सफिशिअंटली स्ट्राँग केस आहे आपली."

 “काय चाललंय तुम्हा दोघांत एवढं? आम्हाला तरी कळू द्या, उपायुक्तसाहेब," मॅडम हसत हसत म्हणाल्या, तसे पाटील चंद्रकांतपासून दूर झाले.

 चंद्रकांत उद्वेगाने म्हणाला “इट इज द सेम स्टोरी अगेन अँड अगेन. ॲज फार ॲज धिस डिस्ट्रिक्ट इज कन्सर्ड. तीच संबंधित जमीनमालक, वकील आणि जज्जची अभद्र युती; तेच अव्वाच्या सव्वा जमिनीचे दर वाढवून देणे आणि तेच आपण अपीलात जाऊ नये म्हणून दबाव आणणे... या प्रकरणातही हे सारं घडत आहे. जसं ते पाटीलना ॲप्रोच झाले व दबाव आणला, तसा माझ्यावरही तोच प्रयोग तेव्हा झाला. पण असफल."

 चंद्रकांत उपसचिव मॅडमना एवढं स्पष्टपणे सांगतील असं पाटीलना वाटलं नव्हतं. पण त्यांना त्या दोघांच्या समान समाजहितैषी दृष्टिकोनाची व भूसंपादन

१७८ । प्रशासननामा