Jump to content

पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/272

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


शुभ ऊर्जा (वैचारिक)
सुजय देसाई
२0१७
_________________________


प्राप्तकालाचे सुंदर स्वप्नरंजन!

 ‘शुभ ऊर्जा' हे सुजय सुंदरराव देसाईंचं छोटेखानी पुस्तक. ते एक संवेदनशील शिक्षक म्हणून त्यांना मी ओळखतो. माणूस खराच संवेदनशील असेल तर सतत विधायकतेचा ध्यास त्याला लागून राहतो. त्यात तो शिक्षक असेल तर त्याची दुहेरी धडपड असते. पहिल्यांदा तो स्वतःला आदर्श बनवतो. विद्यार्थी आदर्श घडायचे तर शिक्षक संवेदी, विधायक, आदर्श अनुकरणीय हवा. इथल्या म्हणजे कोल्हापुरात गांधीवादी विचार करणाच्या मंडळींनी सुमारे पन्नास एक वर्षांपूर्वी समता हायस्कूल सुरू केलं होतं, तेव्हा त्याचे संस्थापक तत्कालीन गांधीवादी कार्यकर्ते म. दु. श्रेष्ठी (वकील) होते. प्रा. चंद्रकांत पाटगावकर त्यांच्या पाठीशी होते. माझे स्नेही व सन्मित्र श्री. कुर्लेकर त्या हायस्कूलचे मुख्याध्यापक होते. आणीबाणीच्या काळात आम्ही सर्व अखिल भारतीय आचार्य कुल परिषदेला । पवनारला गेलो होतो. त्या काळात मी काही काळ सर्वोदय नेते अण्णासाहेब सहस्रबुद्धे यांचा सहायक म्हणून काही काळ सेवाग्राम आश्रमात होतो. हे सारं आत्मचरित्र म्हणून सांगत नसून समता हायस्कूलची गांधीवादी परंपरा । ध्यानी यावी. अशा शाळेत सुजय देसाई यांचे शिक्षक होणं यामागे त्यांच्या वडिलांची परंपरा पुण्याई आहे. संस्काराची शिदोरी असल्याशिवाय कोणी उठून एकदम ध्येयवादी बनत नाही.


प्रशस्ती/२७१