पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/३०८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 सोनिया गांधींनी पंतप्रधानपद स्वीकारले नाही हे त्यांच्या पथ्यावर पडले. कम्युनिस्टांची अरेरावी, लालुप्रसाद, शिबू सोरेन यांचा भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी एका बाजूस आणि दुसऱ्या बाजूस रालोआची आर्थिक धोरणे पुढे चालवण्याची अपरिहार्यता हे सांभाळणे त्यांच्या अरेरावी स्वभावात जुळणारे नव्हते. सोनियाजींनी अत्यंत सोईस्कर अशी भूमिका स्वीकारली. डॉ. मनमोहन सिंह व पी. चिदंबरम यांनी शक्य तितक्या वेगाने रालोआची आर्थिक धोरणे पुढे चालवायची, त्यासंबंधी बोलताना, 'रालोआची धोरणे एका विशिष्ट वर्गाच्या भल्याची होती, देशातील सर्व लोकांचा अंतर्भाव करणारी नव्हती, आमची धोरणे सर्वसमावेशक आहेत,' असा कांगावा करायचा आणि जेथे जेथे संपुआ शासनाचे कार्यक्रम जनसामान्यांचा प्रक्षोभ घडवतील, तेथे बाईंनी फक्त पंतप्रधानांना पत्रे पाठवायची; विशेष आर्थिक क्षेत्र, किरकोळ व्यापार व्यवस्था यांबाबतीत आपण जणू जनसामान्यांच्या नेत्या आहोत, अशा आविर्भावात लिहिलेल्या या पत्रांना भरपूर प्रसिद्धी द्यायची. असा हा संपुआचा विचित्र संसार गेली तीन वर्षे चालू आहे.


 'रालोआने संपुआच्या हाती कारभार सुपूर्द केला, त्या वेळी उत्पादनाची गती उच्चांकाला पोहोचली होती, अंदाजपत्रकी तूट आणि महसुली तूट - दोन्हीही आटोक्यात होत्या, महागाई वाढण्याची गतीही आटोक्याबाहेर गेली नव्हती,' हे सर्व पी. चिदंबरम यांनी संसदेला सादर केलेल्या पहिल्या आर्थिक सर्वेक्षणात मान्य केले आहे. त्यानंतरच्या प्रत्येक अंदाजपत्रकी भाषणात त्यांचा सूर बदलत गेला आहे आणि 'उत्पादनवाढीची गती ८ टक्क्यांवर स्थिरावली आहे, ती ९ किंवा १० टक्क्यांवर झेप घेण्याची शक्यता आहे, ही सर्व करामत संपुआ शासनाच्या धोरणांची म्हणजे आपलीच (मनमोहन सिंह आणि सोनियाजींच्या नेतृत्वाखाली) आहे', असे ते भासवीत आहेत. आता विरोधी बाकांवर बसलेले रालोआचे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा आणि जसवंत सिंग हे प्रत्येक वेळी हा सगळा रालोआचा पराक्रम आहे असे आवर्जून सांगत असतात.
 वस्तुस्थिती अशी आहे, की याचे श्रेय संपुआलाही नाही आणि रालोआलाही नाही. याचे श्रेय काही अंशी डॉ. मनमोहन सिंग यांना जाते; पण ते संपुआचे पंतप्रधान म्हणून नव्हे तर पी. व्ही. नरसिंह राव यांचे अर्थमंत्री म्हणून. १९९० च्या दशकात दिवाळखोरीवर आलेली अर्थव्यवस्था सावरण्याचे काम डॉ. मनमोहन सिंह यांनी (नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली) केले. परिणामतः, गहाण ठेवलेले गंगाजळीतील सोने परत आले, लायसन्स्-परमिट-कंट्रोल राज काहीसे शिथिल

पोशिंद्यांची लोकशाही / ३१०