पान:पायवाट (Payvat).pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पूजन उद्भवलेले नव्हते. ज्या कवितेबद्दल बालकवींची एवढी मोठी प्रसिद्धा आहे ती सगळी कविता प्रामुख्याने बालकवी आणि टिळक, बालकवी आणि गडकरी यांचे संबंध आल्यानंतरची व बालकवी तुतारी मंडळात आल्यानंतरची आहे.
 इंग्रजी कवितेशी बालकवींचा परिचय फारच थोडा होता. त्याच्या कवितेला आधुनिक वळण नंतरच्या काळात मिळालेले आहे. इ. स. १९१२ साली बालकवींनी केशवसुतांच्या कविता निदान एकदा तरी वाचून पाहिल्या पाहिजेत असे मत दिले आहे. हे मत देताना बालकवी म्हणतात, " तथापि त्याच्या खाली एक पायरी आहे.” या खालच्या पायरीवर बालकवींनी लेंभे यांच्याबरोबर रे. टिळक, विनायक, चंद्रशेखर आदी कवींचा उल्लेख केला आहे. बालकवींची ही भूमिका आणि तुतारी मंडळातील त्यांचे सदस्यत्व लक्षात घेतले, तर केशवसुतांकडे पाहण्याची त्यांची भूमिका स्पष्ट समजण्याजोगी आहे. केशवसुत आणि त्यांच्या अनुयायांत गडकरी व बालकवी असे स्वरूप ध्यानात घेतले तर १९४५ पूर्वीच्या सर्व मराठी कवींच्यापेक्षा निराळे असे केशवसुतांचे मोठेपण थोडेसे दिसू शकेल. केशवसुतांचे एवढे जरी मोठेपण आपण वादातीत मानले तरी हे स्थानदेखील मराठी वाङ्मयात लहान नाही.

 केशवसुतांच्यासंबंधी आपण विचार करू लागलो म्हणजे तो विचार अपरिहार्यपणे युगप्रवर्तनाच्या संदर्भात होत जातो. एका अर्थी असे घडणे स्वाभाविक आहे. कारण केशवसुतांपासून मराठी कवितेत नवीन काय आले याचा विचार करण्याची परंपरा रूढ झाली आहे. या पद्धतीने विचार करीत असताना वाङ्मयाच्या व्यवहारात युगप्रवर्तक हा शब्द आपण कोणत्या अर्थाने वापरावा हाच पहिला महत्त्वाचा प्रश्न होऊ पाहत आहे. कारण हा शब्द पुष्कळदा वापरला जातो, पण तो व्यापक अर्थाने घ्यायचा की संकुचित अर्थाने घ्यायचा, यावर अजून सर्वांचे एकमत झालेले नाही; आणि तसे होणे शक्यही दिसत नाही. अगदी व्यापक अर्थाने युग हा शब्द वापरायचा असेल तर त्यात समाजजीवनाची सर्वच अंगोपांगे गृहीत धरली पाहिजेत. नव्या युगाबरोबर नवे समाजकारण, नवे अर्थकारण, नवे राजकारण अशी सर्व जीवनाची नव्याने मांडामांड घडली पाहिजे. या सर्वांच्याबरोबरच जीवनविषयक नव्या जाणिवा, नव्याने उद्भूत झालेली जीवनमूल्ये व त्यांचा वाङ्मयाच्या आशय-अभिव्यक्तीवर घडलेला परिणाम, यांचाही विचार केला पाहिजे. इतक्या व्यापक अर्थाने ज्यावेळी आपण युग हा शब्द वापरू लागतो, त्यावेळी वाङ्मयीन व्यवहारात वावरणाऱ्या व्यक्ती कधीच युगप्रवर्तक ठरू शकणार नाहीत. केशवसुत, हरिभाऊ किंवा अण्णा किर्लोस्कर यांच्यापैकी एकाला अगर तिघांनाही मिळून मग युगप्रवर्तक मानता येणार नाही. एवढ्या व्यापक अर्थाने ज्यावेळी युग हा शब्द आपण वापरतो, त्यावेळी या युगाच्या निर्मितीत व्यक्तीचे कर्तृत्व थोडेसे गौण असते. अशावेळी इंग्रजी राजवटीचे आगमन हीच युगप्रवर्तनाची खूण मानावी लागते. आपल्याकडे या युगप्रवर्तनाची जबाबदारी इंग्रज राजवटीवर टाकली, तर युरोपातील रिनेसान्सची जबाबदारी सांगताना कॉन्टंटिनोपलच्या पाडावाला कारणीभूत झालेली युद्धे व या युद्धांचे युरोपच्या

७० पायवाट