Jump to content

पान:पायवाट (Payvat).pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांची कविता ग्रंथरूपाने प्रकाशित होण्याचा योग आलेला नव्हता. आज ज्यांना आपण दुय्यम कवी म्हणून किंवा कवीच म्हणणार नाही अशा पुष्कळांचे कवितासंग्रह अधूनमधून प्रकाशित होत होतेच. पण १९१७ सालापर्यंत म्हणजे मृत्यूनंतर बारा वर्षेपर्यंत केशवसुतांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला नव्हता. हरि नारायण आपटे यांच्यासारख्या केशवसुतांच्या चाहत्यांनी त्यांच्या अनेक कविता 'करमणुकी'त प्रकाशित केल्या. शेवटी त्यांनीच मित्रऋण म्हणून कवितासंग्रह प्रकाशित केला. समकालीनांनी केशवसुतांची जी उपेक्षा केली, तिचे काहीसे स्वरूप यावरून कळू शकेल.
 यानंतर गडकरी आणि त्यांचे मित्रमंडळ क्रमाने पुढे येऊ लागले. गोविंदाग्रजांनी आपण केशवसुतांचे सच्चे चेले आहोत अशी घोषणा केली व क्रमाने केशवसुतांच्या गुणगौरवाला प्रारंभ झाला. या गुणगौरव करणाऱ्या मंडळीत वाङ्मयाचे अभ्यासक व काव्याचे रसिकच होते असे नाही. भाषाशास्त्रज्ञ गुणे, प्रसिद्ध पंडित वै. का. राजवाडे हेही त्यांत होते. या दोघांही ज्येष्ठांनी केशवसुतांची गणना महाकवींमध्ये करून टाकली. केशवसुत हे युगप्रवर्तक कवी आहेत ही भूमिका यानंतर मोठ्या प्रमाणात घेण्यात आली. १९१२ साली बालकवींनी आधुनिक मराठी कवितेचे स्वरूप सांगताना पुनःपुन्हा केशवसुतांचा आधार घेतला आहे. इथून केशवसुतांच्या लोकप्रियतेला बहर येऊ लागतो. या गौरवाची प्रतिक्रिया रविकिरण मंडळाच्या काळात सुरू होते. माधव ज्युलियनांनी केशवसुतांच्या कवितेवर जो प्रदीर्घ चिकित्सक लेख लिहिला आहे, त्याचा हेतू केशवसुतांचे मोठेपण उलगडून दाखवणे हा नाही, तर केशवसुतांच्या मोठेपणाचा जितका निरास करता येईल तितका करणे हाच आहे. इथून केशवसुतांची लोकप्रियता क्रमाने पडल्याचे दृश्य दिसायला लागते. प्रा. जोगांनी लिहिलेले 'केशवसुत काव्यदर्शन' हे पुस्तक पाहिले तर माझे म्हणणे अधिक स्पष्ट होऊ शकेल. जोगांनी केशवसुतांच्या वाड्मयातले विरोधकांनी दाखवलेले सर्व दोष जवळजवळ मान्यच करून टाकले आहेत, व केशवसुतांनी केलेल्या क्रांतीचे स्वरूप नवे विषय, वृत्तांचे प्रयोग इत्यादींतच हुडकण्याचा प्रयत्न केला आहे. हा तपशीलवारपणे दोष व मर्यादा नोंदविण्याचा आणि माफक स्तुती करण्याचा प्रयोग होता.

 यानंतर कुसुमाग्रज, अनिल इत्यादी कवी पुढे आले. पण या क्रांतिकवींनी आपण केशवसुतांचा वारसा पुढे चालवीत आहो असे कुठे अभिमानाने म्हटलेले दिसत नाही. सामाजिक प्रश्नांविषयी माफक आस्था असणाऱ्या तांब्यांनी केशवसुतांच्या कवितेविषयी जाहीर नापसंती दाखवलेली होतीच. त्याखेरीज सामाजिक प्रश्नांविषयी आस्था असणारे अनिल-कुसुमाग्रजांसारखे कवी होते. सामाजिक सुधारणावादापेक्षा सर्वांगीण क्रांतीचे व समाजवादी क्रांतीचे मोठेपण आणि मात्रावृत्तांपेक्षा मुक्तच्छंदाचे मोठेपण समजावून सांगण्यात या कालखंडात समीक्षकांना अधिक धन्यता वाटत होती. रविकिरण मंडळाच्या उदयापासून नवकाव्याच्या उदयापर्यंत असा एक कालखंड घेतला, तर त्या कालखंडात तांवे यांची कीर्ती इतर कुणाहीपेक्षा अधिक होती. त्यांची लोकप्रियताही भरपूर होती.

केशवसुत : काही प्रतिक्रिया ६७