पान:पायवाट (Payvat).pdf/37

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तसा सिंह आवडता नव्हता. या हत्तीविषयक प्रेमामुळे गोडसे यांनी हत्तीच्या गुणवर्णनाला 'पोत' मध्ये एक पूर्ण प्रकरण वाहिलेले आहे. या गजस्तुतीत अतिरिक्त प्रेमामुळे जे लहरीत आले ते गोडसे लिहून जातात. त्यांच्या मते कोणत्यातरी कारणामुळे अवजड आकाराचे सर्व प्राणी सुमारे साडेतीन कोट वर्षांपूर्वीच नष्ट झाले. याला अपवाद फक्त हत्ती हा प्राणी ठरला. त्यांचे हे विधान खरे नाही हे त्यांनाही माहीत आहे. अतिप्राचीन काळी या प्राण्याला सोंडही नव्हती व लांब सुळेही नव्हते. त्याची उंचीही दोन-अडीच फुटांचीच होती. आज आपणासमोर हत्ती म्हणून जो प्राणी आहे, हा अतिप्राचीन अवजड प्राण्यांच्यापैकी नव्हे. तो उत्तरकालीन प्राण्यांपैकी आहे. असाच उत्तरकालीन अवजड प्राणी गेंडाही आहे. सामान्यत्वे उत्तरकालीन असे कोणतेही प्राणीकुल नष्ट झालेले दिसत नाही. हत्तीही नष्ट झाला नाही. यात हत्तीला अपवादभूत ठरविण्यात फारसा अर्थ नाही. प्रचंड देह, चापल्य, तीक्ष्ण घ्राणेंद्रिय, तल्लख श्रवणेंद्रिय, यांमुळे हत्ती निर्भय ठरला, या म्हणण्यातही वस्तुस्थितीपेक्षा कौतुकाचा भाग अधिक आहे. हत्ती हा प्राणी पशुवर्गातील भक्ष्य नव्हे. हरिणे, ससे, गायी, शेळ्या, मेंढ्या, हीच हिंस्र श्वापदांची भक्ष्ये आहेत. सिंह, चित्ता, रानडुक्कर, गेंडा, हत्ती हे प्राणी असे भक्ष्य नाहीत. पक्षीवर्गापैकी घारी व गिधाडेही भक्ष्य नाहीत. अशा भक्ष्य नसणाऱ्या प्राणिवर्गातील एक हत्ती आहे. याबद्दल त्याचे वाजवी कौतुक करणे रास्त ठरेल. पण जणू काय जंगलचा राजा अशी त्याची स्तुती करणे यात अर्थ नाही. प्राचीन काळापासून हत्ती जलक्रीडेसाठी प्रसिद्ध आहेत. या हत्तीच्या जलप्रीतीचे स्मरण म्हणून गणपतीचे विसर्जन पाण्यात होत असेल काय, असा एक प्रश्न गोडसे यांच्या मनात आलेला आहे. वस्तुतः हा प्रश्न बरोबर नाही. गणपतीचेच नव्हे, गौरीचेही, सर्वच देवदेवतांचे, माणसांचेसुद्धा अंतिम विसर्जन पाण्यातच होत असते. दहन झाल्यानंतर अस्थी पाण्यात टाकण्याची पद्धत प्राचीन काळापासून चालत आलेली दिसते.

  आदिमानव हा मूळचा मांसाहारी नव्हे. त्याचा पूर्वज माकडकुळीतील होता. तोही मांसाहारी नव्हता. आदिमानवाच्याही दातांची रचना मांसाहारी प्राण्याची नव्हे. वन्यपशूचे पाहून माणसाने प्रकृतिसिद्ध नसणाऱ्या, शिकार व मांसाहार या बाबी आत्मसात केल्या. ही गोष्ट फार प्राचीन काळी घडलेली असली तरी ती संस्कृतीचा भाग आहे. मानवाच्या स्वभावसिद्ध प्रकृतीचा भाग नव्हे. आदिमानवाजवळील हत्यारांचा विचार केला तरी धनुष्यबाण हे हत्यार त्याच्याजवळ बऱ्याच उत्तरकाली 'आले' असले पाहिजे. मूळची जुनी हत्यारे दगडी कु-हाडीची अशी दिसतात. या अवस्थेत आदिमानवाला हत्तीची शिकार करणे शक्यच नव्हते. आदिमानवासाठी वन्य गज फक्त भीतीचा विषय होता. गोडसे सांगतात त्याप्रमाणे आदिमानवाच्या अन्नाचा साठा हत्ती असण्याचा संभव फारच कमी आहे. आजही रानटी लोकांत मृत हत्ती खाण्याची प्रथा प्रचलित असल्याचे दिसत नाही. ज्यावेळी माणसाचा भटकेपणा संपला आणि तो स्थिर झाला गावे करून राहू लागला, त्या काळानंतर हत्ती पकडणे व पाळणे ही क्रिया सुरू झाली

पोत ३१