पान:पायवाट (Payvat).pdf/194

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भडकपणा आपण कशाच्या संदर्भात सांगणार आहोत ? एखाद्या साहित्यकृतीचे वर्णन करताना आपण असे म्हणतो की, येथील घटना सुसंगत वाटत नाहीत. कधी आपण म्हणतो, हे सारे खूप सुसंगत असेल पण ते अपरिहार्य वाटत नाही. हे सगळेच म्हणणे जीवनाच्या संदर्भात वाटले पाहिजे. वाङ्मयातील जीवनदर्शन 'खरे वाटले पाहिजे' हे कलामूल्य आहे, पण ती जाणीव जीवनाच्या संदर्भात येणारी आहे. जे तुम्ही सांगता ते 'अपरिहार्य आणि समर्थनीय वाटले पाहिजे.' हे वाटणे पुन्हा जीवनाच्या संदर्भात येणार आहे. समर्थनीयता, अपरिहार्यता, सलगता, एकात्मता, प्रत्ययकारिता हीच सगळी कलावादाची मूल्ये आहेत. या मूल्यांच्या यादीत पृथगात्मता, अनन्यसाधारणत्व यांचाही विचार केला तरी माझी हरकत नाही. या सगळ्या लौकिक जीवनातल्या जीवनसापेक्ष जाणिवा याच जर कलावादी समीक्षेच्या भूमिका असतील, यावरच जर ती समीक्षा उभी असेल, तर ही लौकिक मूल्ये घेऊन कसोट्यांची अलौकिकता तुम्ही कशी सांगणार आहात ?
 कलावादी समीक्षेने संस्कृतीचा विचार फारसा गंभीरपणे कधी केलेलाच नाही. आपण असे गृहीत धरून चाललेलो आहोत की, माणसाने जी संस्कृती निर्माण केली आहे, तिच्यात भावनेची आवाहकता नाही. भावनेचा आपण फक्त एकाच पातळीवर विचार करतो. जीवनवादी समीक्षा जीवनातील गुंतागुंतीचा विचारच न करता एकच पातळी खरी गृहीत धरते असा आक्षेप घेणाऱ्यांनी भावना या शब्दामागे जो आशय आहे, त्यातली गुंतागुंत कधी समजून घेतलेली दिसत नाही. जीवशास्त्राच्या पातळीवर भावना आहेतच. या जीवशास्त्रीय भावनांना जीवशास्त्रीय ध्येय असते असे मढेकरांनी म्हटले आहे. त्यावर दुमत होण्याचे कारण नाही. कारण या जीवशास्त्रीय ध्येयांशिवाय काम-रती आणि शृंगाराचा उदय झाला नसता. त्याशिवाय भूक, भीती, वात्सल्य आणि विश्रांती जन्माला आली नसती. भावनांना ही जीवशास्त्रीय पातळी आहे असे मान्य केल्यानंतर दुसरा प्रश्न निर्माण होतो. जीवशास्त्रीय पातळीवरील भावनांत व्यक्तींचे स्वार्थ आणि हितसंबंध गुंतलेले असतात. भावनांना सांस्कृतिक पातळी आहे काय ? या सांस्कृतिक पातळीवरील भावनांत व्यक्तींचे स्वार्थ आणि हितसंबंध गुंतलेले असतात काय ?

 या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला पुन्हा जीवनाच्या व्यवहाराकडे वळावे लागते. राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याबद्दल फार मोठ्या संतापाचा उद्रेक नुकताच मुंबईत झालेला आहे. राष्ट्रध्वजासारखी व्यापक पूज्यता असणारी बाब आपण बाजूला ठेवू. पण मनुस्मृती जाळल्याबद्दल संताप व्यक्त करणारे लोक आहेत. ही मनुस्मृती जाळण्यात आपण काहीतरी समाजपरिवर्तन घडवून आणतो आहो अशी धन्यता बाळगणारे लोक आहेत. मनुस्मृतीचे दहन वाटल्यास करा, पण ज्ञानेश्वरीला हात लावाल तर खबरदार ! असा इशारा देणारे लोक आहेत. या सर्वच ठिकाणी असणारे सुख-दुःख व्यक्तीच्या जीवशास्त्रीय ध्येयाशी निगडित नाही. माणसे ध्येये उभी करतात, ध्येयांवर प्रेम करतात, आणि ध्येयासाठी मरतात. हे प्राण्यांमध्ये न आढळणारे, फक्त माणूस या प्राण्याचे वैशिष्टय आहे.

१८८ पायवाट