पान:पायवाट (Payvat).pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माणसाच्या माणूसपणावर श्रद्धा असणाऱ्यांना उद्याचे एक सुंदर जग निर्माण होईल हे स्वप्न पाहण्याचाही अधिकार असू नये ? उद्याच्या सुंदर जगाचे स्वप्न वेदकाळापासून हिंदू संस्कृती पाहत आली. साऱ्याच संस्कृतींच्या निर्मात्यांनी हे स्वप्न अधूनमधून पाहिलेले आहे. एक जग असे येईल,—जिथे सर्व सुखी असतील, भयापासून मुक्त असतील, थोडेसुद्धा दुःख असणार नाही, सर्वांचे कल्याण होईल-हे सर्व स्वप्न कुणाला विश्वसनीय वाटेल, कुणाला विश्वसनीय वाटणार नाही. पण एखादी गोष्ट विश्वसनीय वाटणार नाही म्हणून तीवर प्रामाणिक श्रद्धा असू नये की काय ?
 देव आहे की नाही कोण जाणे, पण देव दयाळू आहे या श्रद्धेने भारलेल्या कवींनी अमर कलाकृती निर्माण केलेल्या आहेत. महाकाव्य आशा आणि श्रद्धेतून निर्माण होते, असा याचा अर्थ नाही. निराशेलाही तितकेच भव्य सूर व गीत असू शकेल. उद्याच्या सुंदर जगाचे स्वप्न पाहण्याचा एखाद्याचा हक्क कुणी नाकारू शकणार नाही.
 सुर्व्याच्या कवितेवरची सर्व समीक्षा 'कम्युनिस्ट' या एका सूर्याभोवती फिरत असते. जणू मॅक्झिम गॉर्की आणि मायकोव्हस्की श्रेष्ठ कलावंत नव्हतेच ! याबाबत कुणी कशावर आक्षेप घ्यावा याचा तरी काही धरबंद पाळला पाहिजे. 'माझे विद्यापीठ 'च्या प्रास्ताविक कवितेत यंत्राचा उल्लेख आला आहे. 'यंत्राच्या काळजातील आर्त स्वर तुझ्या कंठात आकार घेऊ दे !!' हे म्हणताना कवीने गुन्हा कोणता केला ? कवितेने प्रचाराला बाधून घेऊ नये हे मान्य करून टाकले म्हणून काय कवितेने मजुरांची दुःखेही पाहू नयेत ? सुर्व्याची कविता सांगते आहे ते क्रांतिगीत नव्हे, ते फक्त व्यथेचे गीत आहे. यंत्रावर काम करणारा माणूस हाही यंत्र होतो, हे पूर्ण सत्य नाही. ते अर्धसत्य आहे. या माणसालाही आर्तता असते, काळीज असते, दुःख असते. त्याचीही नाडी रडत असते. ही धडपड मी व्यक्त करीन, हे दुःखच फक्त व्यक्त करीन, दुसरे काही मी पाहणार नाही, असे कवी म्हणत नाही. तर तो म्हणतो आहे, अजून माइया कंठात माझे दुःख आकार घेत आहे. हे दुःख अधिक व्यापक होऊन यंत्रसंस्कृतीच्या सर्व आर्ततेला व्यापण्याइतके झाले नाही, ते तितके मोठे होवो, माझ्या अंतरात अजून माझ्याच हर्षखेदांचा घंटारव होतो आहे, उडणाऱ्या सगळ्याच नाड्यांचे ठोके माझ्या अंतःकरणात घुम् लागोत, आपले मन व्यापक होवो, त्यात सगळ्यांचे दुःख समाविष्ट होवो, अशी ही साधी मागणी आहे. या मागणीवर बिचकून जाण्याचे काय कारण होते ?

 मर्ढेकरांनी हीच मागणी केलेली नाही का ? अहंतेचे काठीण्य भंगून जावो, मीपणाचे कार्पण्य जावो, आणि आपली कविताही मीपणातून मुक्त होवो. या कवितेला असणारा जो अहंकेन्द्री स्वर आहे, तो स्वर मारला जावो. त्याच्या गळ्याला नख देऊन तो स्वर संपला पाहिजे आणि तुझ्या सामर्थ्याचा स्वर माझ्या व्यंजनाला लाभला पाहिजे ही अपेक्षा मर्ढेकरांनीही व्यक्त केली होती. सगळेच कवी आपले अनुभव व्यापक असावेत ही मागणी करीत असतात. यंत्र म्हणजे मजूर, यंत्र म्हणजे कामगार. या कामगारांचीच दुःखे

११६ पायवाट