Jump to content

पान:पायवाट (Payvat).pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे. तसा असामान्य प्रतिभावंत निर्माण झालेला नाही. आपण असामान्य प्रतिभावंताची चर्चाच करू शकत नाही. तो निर्माण करण्याची पद्धतीही सांगू शकत नाही. आपण सांगू शकतो प्रचलित प्रवृत्तींच्याविषयी, प्रवाहांच्याविषयी. प्रवृत्ती आणि प्रवाह असामान्यांच्यामुळे बलवान होतात, पण त्यांच्याविनाही ते निर्माण होतातच. ते निर्माण का झाले नाहीत, याची चर्चा आपण करतो आहोत. बोधवादाला विरोध करताना सारी समीक्षा जीवनाचा संदर्भ टाळू लागली त्याचा हा परिणाम आहे, असा माझ्या प्रतिपादनाचा इत्यर्थ.
 जसे इतरांचे मुद्दे मर्यादित अर्थाने खरे आहेत, तशीच माझ्याही प्रतिपादनाला मर्यादित सत्यताच आहे हे मला जाणवते. तरीही इतरांच्या मुद्दयांच्या मानाने ही भूमिका आपणाला सत्याच्या अधिक जवळ नेते असे मला वाटते. पण शेवटी हीही एक समजूतच व समजुती चुकीच्या असू शकतात. सामाजिक प्रक्षोभ वाङ्मयात प्रभावीपणे व्यक्त होऊ लागला म्हणजे वाङ्मयाच्या कक्षा विस्तृत होतात, एवढेच गृहीत धरून आपण विचाराला आरंभ केला. त्याचे उत्तर देण्याचा हा प्रयत्न आहे. जे वाङ्मय उपलब्ध वाङ्मयाच्या कक्षा विस्तृत करील, ते त्याची उंचीही वाढविण्याचा संभव आहे. पण उंची वाढवीलच याची खात्री नाही, हे गृहीत धरूनच सगळा विचार मी करीत होतो.

प्रतिष्ठान, एप्रिल १९६८

आजचे मराठी साहित्य सामाजिकदृष्ट्या पुरेसे प्रक्षोभक आहे काय ? १०९