पान:परिचय (Parichay).pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

७२ । परिचय

झालेले आहे. इतिहासाचार्य राजवाडे विवेकसिंधूतील ओवीच्या आधारे अंबानगरी म्हणजे अंभोरे या निर्णयापर्यंत पोचलेले होते. हा त्यांचा पुरावा ठिसूळ वादावर आधारलेला आहे. या वादात अंभोऱ्याचा संबंधच नाही. यापूर्वी कानोले यांच्या पुस्तिकेवर अभिप्राय देताना मी असे मत नोंदविलेले होते की, कानोले यांनी दिलेल्या पुराव्यामुळे मुकुंदराज अंभोऱ्याचे नव्हते, हे नक्की सिद्ध होते. मात्र ते आंबेजोगाईचे आहेत, असे सिद्ध न होता बहुतेक आंबेजोगाईचे असावेत, इतकेच सिद्ध होते.
  माझ्यासमोर अडचणीचा मुद्दा हा होता की, योगेश्वरीमाहात्म्य हा चौदाव्या शतकातील ग्रंथ मुकुंदराज आंबेजोगाईचे, असे उल्लेख करतो. या ठिकाणापासून विसाव्या शतकापर्यंत मुकुंदराज आंबेजोगाईचे, हे उल्लेख दाखवता येतात. पण योगेश्वरीमाहात्म्य हरिनाथाचा उल्लेख करीत नाही. आणि मुकुंदराज ज्या अंबानगरीचा उल्लेख करतात, ती अंबानगरी हरिनाथाची म्हणून करतात. ढेरे यांच्या संशोधनाच्या नंतर आता असे आपण म्हणू शकतो की, हरिनाथ हे चक्रधर आहेत. म्हणजेच चांगदेव राऊळ आहेत. म्हणून ती अंबानगरी लीळाचरित्रानुसार फलटण आहे. विवेकसिंधूतील गुरू रामचंद्र हे रामदेव दादोस आहेत. रामदेव वडनेरचे राहणारे. आंबजईच्या देवळात त्यांची आणि चक्रधरांची भेट शके ११८९ ला झाली. हे रामदेव दादोस म्हणजेच रामचंद्र औरंगाबाद जिल्ह्यात साष्टी पिंपळगाव या ठिकाणी निधन पावले. ही घटना गोविंदप्रभूच्या निधनानंतर व नागदेवांच्या निधनापूर्वी येते. या रामचंद्रांचा शिष्य मुकुंदराज याचा ज्या अंबानगरीशी संबंध येतो, ती अंबानगरी म्हणजे बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई. या आंबेजोगाईकरांना मागच्या परंपरांचे भान नाही. कारण ते मुकुंदराजांनी करू दिलेले नाही. म्हणून योगेश्वरीमाहात्म्यात हरिनाथांचा उल्लेख नाही. आपण आता हेही म्हणू शकतो की, विवेकसिंधूत तत्त्वज्ञान सांगणारा ग्रंथ काव्यमय असावा, याविषयी तीव्र नापसंती आहे. ही नापसंती ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या संदर्भात आहे. हरिनाथांची अंबानगरी आणि मुकुंदराजांची अंबानगरी यांत आता गोंधळ करण्याचे कारण नाही.
 हरिनाथ म्हणजे चक्रधर या भूमिकेचा अजून एक अर्थ आहे. तो सांगण्यापूर्वी थोडे स्पष्टीकरण वेदान्त आणि सिद्धान्त या शब्दांच्याविषयी करावे लागेल. हरिनाथाने रामचंद्राला वेदान्त सांगितला आणि नागदेवाला सिद्धान्त सांगितला, या शब्दांचा निश्चित अर्थ काय समजावा ? जो वेदान्त हरिनाथाने रामचंद्राला सांगितला, तो आपल्याला विवेकसिंधूच्या रूपाने उपलब्ध आहे. हा वेदान्त म्हणजे सरळ सरळ शांकर अद्वैत तत्त्वज्ञान आहे. तेव्हा ही मंडळी शांकर अद्वैताला आणि त्याबरोबर सगळ्याच शैव अद्वैताला वेदान्त म्हणत आहेत, हे उघड आहे. खरे म्हणजे शांकर अद्वैत हा वेदान्ताचा एक भाग आहे. मध्व, रामानुज, वल्लभ, निंबार्क