पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आज भारत आणि संगीताचा फुललेला संसार जेव्हा मी पाहतो...तुम्हीही पाहाल तेव्हा तुमच्या डोळसपणाची, तुमच्या धडधाकट असण्याची शरम वाटल्याशिवाय राहणार नाही, ज्या पार्श्वभूमीवर भारत व संगीता आज पाच पन्नास अंध मुला-मुलींना पदरमोड करून, अनुदानाशिवाय, स्वकष्टाने, स्वावलंबनाने सांभाळतात, शिकवतात हे सारं पाहिलं की, मी-मी म्हणणारे मौन होतात व निष्प्रभही! त्याचं कारण असतं भारत आणि संगीताचा इतिहास, संघर्ष, जिद्द, कार्य आणि बरंच काही.
 भारत मूळचा हातगावचा. हे गाव चाळीसगाव तालुक्यात नि जळगाव जिल्ह्यातलं. वडील दामू निकम शेतकरी. भारतचा जन्म १९ एप्रिल, १९७० चा. जन्मतः डोळस होता. तीन वर्षांचा असताना प्रखर तापाने त्याचे डोळे करपले... तो अंध झाला. वडील अशिक्षित, पण शहाणे होते. त्यांनी भरतला चाळीसगावच्या अंधशाळेत घातलं. अंध असला, तरी हुशार असलेल्या भारतने कधी नापास शेरा घेतला नाही... सातवी, दहावी, बारावी मजल दरमजल करत बी.ए., बी.एड., झाला. तोही अव्वल श्रेणीत. त्याला शिक्षकाची दृष्टी आली... समाजभान आलं... ते शिक्षणापेक्षा अनुभवांनी... लोकांच्या वागण्याबोलण्यातून प्रेरणा घेत घडत गेला... तो स्वत:च स्वत:चा शिक्षक झाला... त्याला वाटलं होतं की, समाज प्रगल्भ आहे... सुजाण आहे... अनुभव मात्र विपरित असायचे. मग त्यानं ठरवलं... भीक, दया नाही मागायची... झालं तेवढं पुरं... येथून पुढे हक्काची भाषा करायची... असा भारतमध्ये बदल घडण्याचंही कारण होतं... शिक्षण पात्रता, योग्यता असून सतत डावलणं जाणं, नाकारणं, उपेक्षा करणं, हटकणं अन् कधी कधी हेटाळणी... उपमर्द... अपमानही! मग त्यानं लेबर लॉ डिप्लोमा केला... कायद्याची कक्षा त्याच्या कवेत आली... एवढी योग्यता धारण करूनही त्याला नोकरी मिळाली ती टेलिफोन ऑपरेटर म्हणून... तीही टेंपररी, सिझनल! धुळ्याला शुगर फॅक्टरीत नोकरी करायची नि शनिवारी, रविवारी नाशिकला जाऊन तो राष्ट्रीय अंध कल्याण संस्था (नॅब), नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाइंड (एनएफबी) चं कार्य करू लागला... कार्यकर्ता झाला... महाराष्ट्रभर फिरू लागला... जिल्हा परिषद, नगरपालिका, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सारी कार्यालयं तो सहकाऱ्यांना घेऊन पालथी घालू लागला... प्रथम विनंती, नंतर निवेदन, रजिस्टर्ड पत्र, स्मरणपत्र, माहिती अधिकारी, अंधांचे आरक्षण अशी पायरी चढत तो सहकाऱ्यांसह सर्वांसमक्ष अधिकारी, पदाधिकाऱ्यांना जाब विचारू लागला... सांख्यिकी माहिती मागू लागला तसं चित्र बदललं... महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात अंधांच्या सामूहिक प्रयत्नांना यशाची पालवी फुटू लागली. फेडरेशनच्या

निराळं जग निराळी माणसं/१३९