Jump to content

पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

/काँटिनेंटल कल्चर, इकॉनॉमिक्स, इंडस्ट्री, ऍग्रिकल्चर, पॉलिटिक्स, सिव्हिक्स, मॅनेजमेंट, लँग्वेज, लिटरेचर, मेडिकल, लॉ, असे मोठे विषय सोपे करून सांगणारे तोंड ओळख करून देणारे अभ्यासक्रम असतील. हायस्कूल्समध्ये स्पेस लॅब, मॉक पार्लमेंट, लँग्वेज लॅब, सायन्स लॅब, ई-लायब्ररी, ई-बुक्स, ई-जर्नल्स, जिम्नॅशियम, फायरिंग रेंज, रनिंग ट्रॅक्स, इनडोअर, आऊट डोअर स्टेडियम्स, स्विमिंग टॅक्स, बँक, पोस्ट, शॉप्स, मिनी मॉल्स, मार्केट, एटीम्स, वेंडिंग मशिन्स (चॉकलेट, दूध टीन्स, स्टेशनरी, गॅजेटस् इ. पैसे टाकून मिळणारी) सर्व असेल, मुले लॅपटॉप, मोबाईल्स धारक असतील, शिक्षक व्हर्च्युअल होतील.
 संस्थाचालक शाळेचे पदसिद्ध सीएमडी असतील, शाळेचे प्राचार्य हार्वर्ड रिटर्न असतील. पालक किमान पदवीधर असतील. शाळा हार्वर्ड, ऑक्सफर्ड, केंब्रिजची ब्रांच असेल. पण या सर्वांचा पाया, आत्मा स्थानिक असेल. इथली माणसे, इथली माती, इथली मने पाहता पाहता जागतिकीकरणाचे अंग होतील, त्याचे कारण २०१५ पासून युनो, युनेस्को, युनिसेफ मार्फत 'Post-2015' (http://www.unesco.org/new/en/education/themes/leading-the-international-agenda/education-forall/education-post-2015) नावाचे एक व्हिजन डॉक्युमेंट मी नुकतेच इंटरनेटवर वाचले आणि लक्षात आले की जे नायजेरिया, युगांडा, इथिओपिया, लिबिया, सीरिया, भूतान, श्रीलंकेला होणार आहे, त्याच्याआधी ते भारतात नक्कीच होणार. वरील स्वप्न शाळेस पैसे फार लागणार नाहीत. आज आपण कॉंक्रीटच्या नामक गोदामी शाळा बनवत आहोत. त्यापेक्षा कमी पैशात या शाळा शक्य आहेत. पूर्वी बँकेस १००'x१००' ची जागा लागायची. आता १०x१० ची केबिन, एटीएमद्वारे सर्व काम करते. शाळेचेही तसेच आहे. एकविसाव्या शतकातली भविष्यलक्ष्यी शाळा, शिक्षण, शिक्षक विद्यार्थी, पालक हे नव्या ज्ञानसमाजाचे स्टेकहोल्डर रहाणार आहेत. नवे शिक्षण हळूहळू अंकीय, संगणकीय, अंतर्जालीय होत होत ते एकदिवस ऑनलाइन, आभासी (Virtual) होत 'One to One' होईल. त्यांची सुरुवात आपण बालवाडीपासून करू. विद्यापीठाचे स्वप्न पाहू. उद्याच्या जगात स्थान, वेळ, गती, अंतर या साऱ्या गोष्टी शून्य होऊन जातील. तुम्ही जिथे असाल, तेच तिथेच जग असेल. जग जिंकायची तयारी करायची असेल तर वरील नव्या जगाची रचना, निर्मिती आपण आजच नि आत्ताच करायला हवी.

•••

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१०५