Jump to content

पान:देशी हुन्नर.pdf/34

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ २८ ]

करण्याकडें पुष्कळ पैसा खर्च होई. बांबूच्या चिंभा घोटून घोटून इतक्या गुळगुळीत करीत असत कीं, त्या "डोळ्यांत घातल्या तर खुपूं नयेत. " या चिंभांची छतें करीत व खांब ताडाच्या झाडाचे करीत. हे खांबही असेच घोंटून घोटून गुळगुळीत करीत असें ह्मणतात. वर सांगितलेल्या बांबूच्या ताटीवर अभ्रकाचे तुकडे ठेवून त्याजवर 'नीलकंठ' नांवांच्या ( यास आपल्याकडे 'नवरंग' म्हणतात ) पक्षाची पिसें पसरून त्याच्यावर पेंढ टाकीत असत. या अभ्रकाच्या खालून पिसांचा रंग इतका सुंदर दिसे कीं, त्याजकडे लक्ष जाऊन ध्यान भजनाचा भंग होऊं नये ह्मणून खालून कापडाचें छत लावीत असत असें म्हणतात. अलीकडे विटांची घरें लोक बांधू लागले आहेत त्यामुळे बंगाल प्रांतांतील 'चंदी मंडपाचा' ऱ्हास होऊं लागला आहे.

नक्षीदार विटा व संदल्याचें काम.

 बंगाल्यांत पूर्वी विटांवर नक्षीचें काम करीत असत. असल्या विटांचें दिनापूर शहरीं कांतनगर नावाचें एक देऊळ आहे. याजवरील नक्षी ठळक असून विचित्र आहे. काहीं ठिकाणीं ती सुरेख आहे असें ह्मटलें तरी चालेल. चंद्रनगरासही असेंच एक देऊळ आहे परंतु त्याजवरील नक्षी इतकी चांगली नाहीं.
 संदल्याचें नक्षीदार काम डाका शहरांतील घरांवर जिकडे तिकडे दृष्टीस पडतें. या सुरेख कामाचे नमुने बाबू मोहीमचंद्र बसाक नांवाच्या एका गृहस्थानें मोठया श्रमानें मिळवून विलायतेंतील प्रदर्शनांत सन १८८६ साली पाठविले होते. हल्लीं असल्या कामास कोणी पुसत नाहीं. त्यामुळे हा धंदा बुडत चालला आहे. आपले प्रांतांत असें काम करणारा एक कारागिर विजापूर येथें आहे. त्याचे कामाचे नमुने मे. एबडन साहेब यांनीं येथील प्रदर्शना करितां पाठविले आहेत.
 रंगविलेले पदार्थः-मडकीं, बरण्या, लांकडाच्या पेट्या, देवहरे, वगैरे काहीं सामान पाण्यांत कालविलेल्या रंगाने रंगविण्याची चाल कोठें कोठें आहे.
 रंगविलेली मडकीं:-गौंरी हाराजवळ मांडण्याकरितां किंवा संक्रांतीच्या दिवशीं लागणारीं सुगडें आपल्या देशांत करण्याची चाल कोठें कोठें आहे. परंतु त्याजवर काढिलेल्या नक्षीस नक्षी ह्मणण्याची सुद्धां आह्मांला लाज वाटते. मडक्यावर नक्षी गयेस फार चांगली काढतात. बंगाल्यांत “बीलमाती" नां-