Jump to content

पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/81

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माझ्या पिढीने देशास विकसित देश होण्याच्या उंबरठ्यावर आणून उभं केलं. माझ्या पिढीत सर्वच काही आदर्श होतं असं नाही. पण संघर्ष, जिद्द, घडण्याच्या सच्चेपणाबद्दल कुणाला शंका असणार नाही याची मला खात्री आहे.(अगदी आमच्या मुला-सुनांच्या पिढीसही!)
 आमच्या पुढची पिढी आणीबाणीनंतर जन्मली. आणीबाणीचं वर्णन देशाचं दुसरं स्वातंत्र्य असं केलं जातं! दुसऱ्या स्वातंत्र्यानंतर देशानं मोठ्या गतीनं प्रगती केली. शेतीबरोबर व्यापार, उद्योग, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात माझ्या पिढीनं घोडदौड केली. या संपन्नतेची फळे चाखत आमच्या पुढची पिढी पाहता-पाहता प्रौढ झाली.
 आमच्या मुला-सुनांच्या वाढीच्या काळात आमच्या पिढीनं एक चूक केली. आपल्या जीवनात जे मिळालं नाही ते मुलांच्या पिढीस दिलं. देताना स्वतःच्या अभावग्रस्त, ओढग्रस्त जीवनाची जाणीव ठेवून भरभरून, एक मागितलं तर दोन दिलं. या पिढीस त्यांच्या वाढीच्या काळात ऊन, पाऊस, थंडी लागू दिली नाही. त्यांना त्यामुळे दुष्काळ नि पुरातील फरकच समजला नाही. सुकाळात वाढणाऱ्या पिढीस परदुःखे शीतल राहतात हेच खरे!
 चूक आमचीच झाली असं स्वातंत्र्याचा हीरकमहोत्सव साजरा करत असताना आमच्या पिढीनं कबुलीजबाब द्यायला हवा. आम्ही स्वसंघर्षाच्या कैफातून आलेल्या समृद्धीचं वरदान नव्या पिढीस देत असताना स्वजीवनात जपलेले संस्कार, संवेदनाही द्यायला हव्या होत्या. त्यांना पूर, दुष्काळ दाखवायला हवा होता. नुसतं आकांक्षांचं हेलिकॉप्टर दाखवत राहिलो. माणूस, जगणं, परपीडाही त्यांना शिकवायला हवी होती. ते राहून गेलं खरं!

***

जाणिवांची आरास/८0