Jump to content

पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/36

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

साबरमती नहीं सब्र मति

 माणूस गुजरातला जातो नि त्यास महात्मा गांधींची आठवण होत नाही असं सहसा घडत नाही. गुजरातला जायचं ठरल्यावर मी महात्मा गांधींचा साबरमती आश्रम पाहायचं ठरवून टाकलं होतं. किंबहुना गुजरात विद्यापीठातील बैठकीचं निमंत्रण न टाळण्याचे मुख्य कारण साबरमती आश्रमच होतं.
 संथ वाहणाऱ्या साबरमती नदीच्या किनारीच महात्मा गांधींनी आश्रम का स्थापला तेथपासून तिथल्या सर्व प्रयोगांची साद्यंत माहिती आपणास गांधी स्मारक संग्रहालय देतं.भारतीय स्वातंत्र्याचा साक्षीदार असणारा हा सत्याग्रह आश्रम अधिक चांगला ठेवला पाहिजे असा तो सारा परिसर पाहून माझी खात्री झाली.

 'हृदयकुंज' ही खरी बापू कुटी. तिथं बापूंची खोली, स्वयंपाक घर, बैठक हे सारं त्या काळात इतिहास म्हणून नेत असलं तरी तिची मांडणी अधिक सजीव व्हायला हवी. तिथं अनेक खलबतं, भेटी, निर्णय झाले ते सचित्र जिवंत करता येईल. कस्तुरबांच्या खोलीची ओळख नुसत्या तिथल्या एका पाटीनंच होते. सारी खोली रिकामी... स्त्रीकडे पाहण्याचा भारतीय दृष्टिकोनाचा हा तर सज्जण नि सलज्ज पुरावाच! तीच गोष्ट मीराबेन नि विनोबांच्या कुटीची!! आपल्या कल्पना दारिद्रयाचं नि उदासिन वृत्तीचं ते प्रतीक! मिठाच्या सत्याग्रहाच्या दांडी यात्रेची गंगोत्री समजल्या जाणारा हा आश्रम... अवघ्या तपभरानंतर आपल्या स्थापनेची (२०१९) शताब्दी साजरी करेल, पण तोवर इतिहास फार पुसट होऊन जाईल...!

जाणिवांची आरास/३५