Jump to content

पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एका बाजूला आघाडी उघडली जात आहे. शारीरिक ताकदीलाच मानणारे तंत्रज्ञान मागे पडून इलेक्ट्रॉनिक्सने स्नायूचे बळ आवश्यक नसणारे तंत्रज्ञान पुढे आणले आहे. विज्ञानात एका नव्या युगाची पहाट होत आहे. नवे पदार्थविज्ञान समजण्यासाठी पुरुषांना उपलब्ध असणाऱ्या मितिज्ञानापेक्षा स्त्रियांना सहजसुलभ प्रतिभा जास्त उपयोगाची आहे असे मांडले. हजारो वर्षांच्या गुलामगिरीच्या काळात स्त्रियांनी ऋजुता, सौम्यपणा, सोशिकता, नीटनेटकेपणा, टापटीप इत्यादि गुण अंगी बाणून घेतले आहेत. नवीन युगात हेच गुण पुरुषी दंडेलीपेक्षा अधिक उपयोगी ठरणार आहेत. शेतकऱ्यांच्या पहाटेबरोबरच स्त्रियांचाही उष:काल येणार आहे हे निश्चित. पण यासाठी प्रयत्न कोणत्या दिशेने व्हावयास पाहिजे? स्त्रियांचे युग येत आहे, येत आहे म्हणून स्वस्थ बसून राहण्याने काही साधेल हे कठीण व हातातोंडाशी आलेली संधी निघून जायची शक्यता जास्त. मग स्त्रियांचा कार्यक्रम हा कोणत्या पद्धतीने असावा?
 चांदवडनंतरच्या चर्चा
 चांदवडच्या अधिवेशनात हा विचार मांडला गेला आणि त्यावर लाखलाख स्त्रियांनी आपले शिक्कामोर्तब केले. 'आम्ही माणसे आहोत, माणसे म्हणून जगण्याचा आम्हाला हक्क आहे' असा घोष केला. एक निश्चित कार्यक्रम जाहीर केला. चांदवडच्या अधिवेशनात जमलेल्या स्त्रियांनी काही महत्त्वाचे ठराव मंजूर केले. रोजगार हमी योजना, स्त्रियांच्या रोजगारासाठी सोयी आणि मेहनताना, पिण्याच्या पाण्याची सोय आणि खेडेगावातील मुलींचे शिक्षण अशा विषयांवर नवीन दृष्टिकोन देणारे ठराव तर झालेच, पण त्यापलीकडे समान नागरी कायदा, स्त्रियांचे मालमत्ता, हुंडा, पोटगी इत्यादि प्रश्न, स्त्रियांवरील अत्याचार आणि स्त्रियांना प्रतिष्ठा प्राप्त व्हावी यासाठी सार्वजनिक सत्तास्थानांवर ताबा मिळवणे अशाही विषयांवर ठराव झाले. जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढविण्याचे ठरले पण प्रत्यक्षात पंचायत राज्याच्या निवडणुका महाराष्ट्रात तेव्हापासून झाल्याच नाहीत. तरीसुद्धा पंचायत राज्य संस्थांत स्त्रियांना महत्त्वाचा वाटा मिळाला पाहिजे हे आता विरोधी पक्षांनीच नव्हे तर राज्यकर्त्यापक्षानेही मान्य केले आहे. केंद्र शासनाच्या नवीन पंचायत राज बिलात स्त्रियांसाठी तीस टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद आहे. एवढेच नव्हे तर शेतकरी महिला आघाडीच्या जिल्हा परिषद निवडणूक जाहीरनाम्यातील बहुतेक भाग या बिलात मान्य करण्यात आला आहे.

 'चांदवडच्या शिदोरी'बद्दल देशभर मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. मार्क्सवाद्यांनी अर्थातच टीकेचा भडीमार केला. पण नव्या महिला आंदोलनास

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ८३