पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





-१०-

इहवादी दृष्टिकोन


 आपल्या समाज-पुरुषाच्या देहावर क्ष-किरणें टाकतांना विष्णुशास्त्री यांनी पूर्णपणे इहवादी दृष्टिकोन स्वीकारला होता, हें मागील विवेचनावरून ध्यानांत येईल; पण त्या लेखांत ज्या व्यंगांचा, दोषांचा विचार केला आहे त्यांचा परमार्थाशीं, धर्माशीं, अध्यात्माशी फारसा संबंध नव्हता. देशाभिमान ही वृत्ति, काव्याची वा विद्येची अभिरुचि, वास्तव- दृष्टि, विनोद-बुद्धि यांचा येथे अभाव होता, असें म्हणण्यांत धर्म-ग्रंथाला, धार्मिक परंपरेला धार्मिक तत्त्वांना कोठे बाधा पोचत नव्हती; पण ज्या तत्त्वांचीं, रुढींचीं, परंपरांची मुळें धर्मामध्ये आहेत त्यांची चिकित्सा करतांनाहि ते इहवादी दृष्टीचाच अवलंब करतात, असें आपणांस दिसून येईल. इंग्रजी विद्येला वज्र म्हणणाऱ्या व भौतिकज्ञान हेंच सर्व उन्नतीचें साधन आहे असें सांगणाऱ्या पंडिताच्या बाबतींत असें नसतें तरच नवल वाटलें असतें.
निवृत्ति
 आपल्या धार्मिक परंपरेंत अनेक शतकें निवृत्तिवादाचें फार महत्त्व होतें, हजारो वर्षे हिंदी लोक परलोकवादी व इहविमुख होऊन बसले होते, हें सर्वांस माहीतच आहे. 'इतिहास' या निबंधाच्या प्रारंभीच प्राचीन हिंदु लोकांत सप्रमाण व खरे इतिहास लिहिण्याची प्रवृत्ति कां नव्हती हें सांगतांना, निवृत्तिवाद हे एक मोठे कारण म्हणून विष्णुशास्त्री यांनी सांगितलें आहे. ते म्हणतात, "आपल्या लोकांच्या मनाचा एकंदर कल निवृत्तिमार्गाकडे जेवढा दृष्टीस पडतो तेवढा प्रवृत्तिमार्गाकडे नाही. जग सर्व मिथ्या आहे, प्रपंचांतील सर्व व्यवहार लटके आहेत, अवघा ईश्वरी मायेचा गोंधळ आहे. "दिसें क्षणिक सर्व हें भरंवसा घडीचा नसे," असे विचार ज्यांच्या मनांत नेहमी घोळावयाचे, ज्यांचा परमार्थाकडेच विशेष ओढा, अशा