पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

इंग्रजी विद्येचें वज्र । ४१

होत असे. पण असे असले तरी पाश्चात्त्य संस्कृति, पाश्चात्त्य विद्या यांच्या बाबतीत मात्र त्यांनी आपला विवेक केव्हाही ढळू दिलेला नाही; आणि ज्या गुणांमुळे व संस्थांमुळे इंग्रज व युरोपीय लोक वैभवास चढले ते गुण व त्या संस्था यांचा त्यांनी मुक्तकंठाने गौरव केला आहे. त्यांचे अनुकरण केल्यानेच आपली प्रगति शक्य होईल हे त्यांनी अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलें आहे. तेव्हा या त्यांच्या मतांचा प्रथम परिचय करून घेऊ; आणि नंतर त्यांच्या आत्मनिरीक्षणशक्तीचा परामर्श घेऊ.
इंग्रजांचे ऋण
 लोकसत्ताक राज्यपद्धति ही पाश्चात्त्य संस्कृतीकडून भारताला मिळालेली सर्वांत मोठी देणगी होय. विष्णुशास्त्री यांना हें पूर्णपणे मान्य असून, विचारस्वातंत्र्य, मुद्रणस्वातंत्र्य, लोकमतांविरुद्ध आपले मत निर्भयपणे मांडण्याचा प्रत्येक व्यक्तीचा हक्क, दुसऱ्याच्या मतांचा आपल्याइतकाच आदर करण्याची पद्धत हीं जीं लोकशाहीची मूलभूत तत्त्वें त्यांवर त्यांची दृढ श्रद्धा होती; आणि अशा तऱ्हेचें मानसिक स्वातंत्र्य इंग्रज राज्यकर्त्यांनी हिंदी प्रजेला दिले याबद्दल त्यांनी अनेक ठिकाणीं कृतज्ञता व्यक्त केली आहे. 'मराठी भाषेची सांप्रतची स्थिति' हा निबंधमालेतला पहिला निबंध. त्यांतच ते म्हणतात, "वरच्या लिहिण्याने हल्लीच्या राज्यांचा आम्ही द्वेष करतों किंवा त्यांनी आपल्या देशावर जे अपरिमित उपकार केले आहेत किंवा अजूनहि करीत आहेत ते आम्ही जाणीत नाही, असें नाही. आम्हांस तर वाटतें की, असे विचार करण्याची आमच्या अंगीं शक्ति आणून, त्यांचा उल्लेख उघडपणें करण्याची जी मोकळीक आमचें सरकार आम्हांस देत आहे, त्यापरतें औदार्य कोणतेंहि नाही. ते मनांत येऊन वरच्यासारखे लेख लिहितांना कृतघ्नत्वशंकेने लेखणी वरचेवर अडखळते." 'आमच्या देशाची स्थिति' या शेवटच्या निबंधांत हीच कृतज्ञता त्यांनी प्रारंभी व्यक्त केली आहे. "त्याप्रमाणेच मानसिक स्वातंत्र्य हाहि या काळांत झालेला एक मोठाच लाभ आहे. मानसिक स्वातंत्र्य म्हणजे हवा तसा विचार करण्याची व ते विचार वाग्द्वारा किंवा लेखनद्वारा प्रसिद्ध करण्याची मोकळीक. हल्लीच्या राज्यांत आम्हांस जितकें स्वातंत्र्य आहे तितकें यापूर्वी स्वदेशीय राजांच्या उत्कृष्ट कारकीर्दीतहि कधी नव्हतें." असे धन्यवाद त्यांनी इंग्रज राज्यकर्त्यांना दिले आहेत.
 कायद्याने इंग्रज सरकारने विचारस्वातंत्र्य दिले असले तरी प्रत्यक्ष व्यवहारांत दंडेलीने असें स्वातंत्र्य हिरावून घेण्याचे प्रकार त्या वेळीं अनेक घडत. त्यांवर टीका करतांना शारीरस्वातंत्र्य म्हणजे हवें तें करण्याची मोकळीक व मनाचें स्वातंत्र्य म्हणजे हवा तसा विचार करण्याची मोकळीक हे दोन्ही मनुष्याचे जन्मसिद्ध हक्क आहेत, असा सिद्धान्त 'गर्व' या निबंधांत विष्णुशास्त्री यांनी मांडला आहे.
विचारकलह
 प्रत्येकाला विचारस्वातंत्र्य दिलें की कोणताहि विषय असला तरी त्यावर भिन्न मतें होणारच आणि त्यांतून विचारकलह निर्माण होणारच. या विचारकलहा-