पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३८ । केसरीची त्रिमूर्ति

वर्षांपूर्वीच तो ज्ञात असतो. वास्तविक आपलें जें थोडें तुटपुंजें ज्ञान आहे तें सर्व आपण पूर्वेकडून घेतले आहे. प्रथम पूर्वेकडून तें ग्रीकांनी मिळविलें, नंतर रोमनांनी आणि त्यापुढील शतकांत हीं दोन्ही राष्ट्रे तमोयुगांत गेल्यावर आरबांनी तेंच ज्ञान युरोपला परत दिलें. तेव्हा आपण जास्त बुद्धिमान् आहों, जास्त उद्योगी आहों, असें मानणें हा कमालीचा उद्दामपणा आहे. अगदी उद्दाम असा गर्व आहे.
 अशा या गर्वाला प्रथम तसल्याच गर्वाने उत्तर देणें हें अवश्य होतें. गर्व या निबंधांत सविस्तर विवेचन करून विष्णुशास्त्री यांनी हा विचार फार चांगल्या रीतीने मांडला आहे. ते म्हणतात, आपली खरी योग्यता लोकांत कमी करण्याचा जो यत्न करील त्याशीं गर्वाची वागणूकहि समजदार मनुष्यास करावी लागते. तसें तो न करील तर आपल्या अंगच्या खऱ्या योग्यतेचाहि नाश व्हावयाचा. याचा उत्कृष्ट प्रत्यय सध्या आमच्या देशांतच येत आहे. असें म्हणून शास्त्रीबुवांनी इंग्रज मिशनरी, इंग्रज ग्रंथकार व इंग्रज शिक्षक यांनी आम्हांस मतिमंद, कर्तृत्वशून्य व अत्यंत नीच असे क्षुद्र प्राणी ठरविण्याचा जो प्रयत्न चालविला होता त्याचें वर्णन केलें आहे.
विसाव्या शतकांतहि
 फेब्रुवारी १९६८ च्या ' रीडर्स डायजेस्ट'मध्ये अमेरिकेतील 'टाइम'मधील एक लेख संक्षिप्त करून दिला आहे. तो लेखक म्हणतो, "भ्रष्टाचार, लाचलुचपत, अप्रामाणिकपणा, ही पौर्वात्य देशांची परंपराच आहे. करप्शन हा शब्द फक्त पाश्चात्त्य आहे; पण त्याचा आशय सगळा पूर्वेतच आहे. आता सिसिलींतील 'माफिया' आणि फ्रान्समधील वसुली अधिकारी, असली उदाहरणें पश्चिमेंत आहेत; पण ते अपवाद होत. पूर्वेकडे तो नियम आहे. त्यांची परंपराच ती आहे. ख्रिश्चन धर्मात ज्याप्रमाणे भ्रष्टाचार, पाप यांचा अधिक्षेप, निषेध केलेला आढळतो त्याप्रमाणे एकाहि पौर्वात्य धर्मांत आढळत नाही."
 आज अमेरिका, फ्रान्स, इटली येथील भ्रष्टाचाराचीं, स्वैराचाराची, गुन्हेगारीची, मादक व्यसनांची, अनाचाराचीं जीं वर्णनें 'रीडर्स डायजेस्ट 'मध्येच येतात आणि जी तिकडील लेखकांनीच केलेलीं असतात, तीं वाचलीं की अंगावर काटा उभा राहतो आणि मानवाच्या एकंदर संस्कृतीविषयीच चिंता वाटू लागते. असें असतांना अमेरिकेतलाच एक लेखक पौर्वात्य देश नियमाने अनाचारी असून पश्चिमेत तो अपवाद आहे, असें सांगण्याचें धाडस करतो, आणि पौर्वात्य धर्म-ग्रंथांचा गेलीं शंभर वर्षे पश्चिमेत सतत अभ्यास चालू असतांना त्या धर्मांत अनाचाराचा निषेधच केलेला नाही, असें लिहितो तेव्हा, अज्ञान भ्रांती मनुष्याला किती किळसवाणा मद चढविते, तें दिसून येतें. ही आजची, विसाव्या शतकाच्या आठव्या दशकांतली स्थिति; मग शंभर वर्षांपूर्वी शस्त्रबलाने रणांत पाश्चात्त्यांनी बहुतेक सर्व पूर्व- देश जिंकले असतांना ते किती मदोन्मत्त झाले असतील याची सहज कल्पना येईल.